पनवेल : वार्ताहर
पनवेल शहर व परिसरात गेल्या काही दिवसापासून सुरळीतपणे सुरू असलेला वीज वितरण कंपनीचा कारभार अचानकपणे अनियमितपणा सुरू झाल्याने वीज ग्राहक चांगलेच वैतागले आहेत.
लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक जण घरातच सुरक्षित राहत आहेत. अशा वेळी घरांच्यांना वीजेचा मोठा आधार आहे. टीव्ही, फ्रीज, मोबाइल चार्जिंग, पंखा, एसी व इतर विद्युत उपकरणांसाठी वीजेचा पुरवठा होणे महत्वाचे आहे. परंतु काही दिवसापासून वीज पुरवठ्यामध्ये अनियमितपणा येवू लागल्याने ग्राहक खुपच हवालदिल झाले आहेत.
मे महिन्याच्या दिवसामध्ये वातावरणामध्ये गर्मी वाढली आहे. त्यातच वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार घडत आहेत. शहरासह ग्रामीण भागात याचा फटका बसत चालला असून पनवेल शहरात गेल्या दोन दिवसापासून वीजेचा पुरवठा हा अनियमितपणाने होत असल्याने त्याचा परिणाम उपकरणावर झाला आहे. एलईडीसारखे बल्ब सुद्धा उघड-झाप करू लागले आहेत. तर काल रात्रीपासून चाणाक्य हॉटेलजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने पनवेल परिसरातील अनेक विभागाचा विद्युत पुरवठा सारखा खंडीत होत होता. त्याचा त्रास ग्राहकांसह वीजेच्या उपकरणांना सुद्धा झाला आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक कंपन्या, मॉल, दुकाने, घरे, कारखाने बंद असल्याने वीजेचा वापर कमी होत आहे. तरी यात सुरळीतपणा येत नसल्याबद्दल ग्राहकांनी असंतोष व्यक्त केला आहे. या संदर्भात संबंधित खात्याशी संपर्क साधला असता तांत्रिक बिघाड काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात येत आहे.