Breaking News

मतदान झाले, आता दीर्घ प्रतीक्षा! मावळमधील निकालाच्या अंदाजाबाबत सर्वत्र चर्चा

उरण : प्रतिनिधी

मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सोमवारी (दि. 29) मतदान झाले. या मतदारसंघातून एकूण 21 उमेदवार निवडणुकीसाठी उभे असताना खरी लढत मात्र महाआघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार विरुद्ध महायुतीचे उमेदवार व विद्यमान खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे अशीच आहे. त्यामुळे मावळचा राजकीय मावळा कोण याकडे मतदारसंघातील नागरिकांसह संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. लोकसभेचा मावळ मतदारसंघ हा सन 2009 साली अस्तित्वात आला. या मतदारसंघात घाटमाथ्यावरील पिंपरी, चिंचवड व मावळ आणि घाटाखालील कर्जत, उरण व पनवेल अशा मिळून सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला. सुरुवातीला या मतदारसंघातून शिवसेनेचे गजानन बाबर हे निवडून आले. त्यांनी राष्ट्रवादीच्या आझम पानसरे यांना पराभूत केले होते. त्यानंतर 2014मध्ये शिवसेनेकडून श्रीरंग बारणे यांना तिकीट देण्यात आले व ते राष्ट्रवादीच्या राहुल नार्वेकर यांचा पराभव करून निवडून आले. त्यावेळी शेतकरी कामगार पक्ष स्वबळावर निवडणूक लढला असताना त्यांचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांचाही पराभव झाला होता.

मावळ लोकसभा मतदारसंघात दोन वेळा शिवसेनेचा उमेदवार निवडून आल्याने हा मतदारसंघ युतीचा बालेकिल्ला समजला जातो. या वेळी शिवसेना, भाजप, रिपाइं व मित्रपक्षांची महायुती होऊन श्रीरंग बारणे पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात उतरले; तर त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप व अन्य पक्ष मिळून बनलेल्या महाआघाडीचे पार्थ अजित पवार मैदानात होते. गेला महिनाभर सुरू असलेली उमेदवारांची धावपळ सोमवारी सायंकाळी थंडावली. ऐन उन्हात मावळ लोकसभा मतदारसंघात मतदानास नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद लाभला. काही ठिकाणी नागरिकांनी सकाळीच मतदान केले. उन्हामुळे मतदारांनी घरात राहणे अधिक पसंत केल्याने दुपारी 11.30पर्यंत 17.5 टक्के इतकेच मतदान झाले होते. दुपारनंतर उन्हाच्या झळा कमी झाल्यावर मतदारांचा ओघ मतदान केंद्राच्या दिशेने वाढू लागला. यामध्ये नवमतदार, ज्येष्ठ मतदारांसह महिलांचाही समावेश होता. या सर्वांनी मतदानाचा आपला हक्क बजावल्याने सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाचा टक्का वाढला. सरतेशेवटी मावळ लोकसभा मतदारसंघात 59.49 टक्के मतदानाची नोंद झाली. 2014 मध्ये 60.11 टक्के इतके मतदान झाले होते.

निवडणुकीचा निकाल सर्व ठिकाणचे मतदान संपल्यानंतर 23 मे रोजी जाहीर होणार असल्यामुळे सर्वांनाच आता दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply