Breaking News

समाजसुधारक स्व. नानासाहेब पाटील

शेकापचे ज्येष्ठ नेते व परिवर्तनवादी चळवळीचे मार्गदर्शक आदरणीय नानासाहेब पाटील यांच्या निधनाची बातमी समजली तेव्हा खूप दुःख झाले. त्यांच्या निधनाने समाजाविषयी आत्मियता असणारा, परंतु समाजातील जुन्या अनिष्ट रुढी, परंपरा झुगारून देऊन नव्या विकासात्मक विचारांची गुढी उभारणारा नेता आपल्यातून हरपला आहे.

नानासाहेब पाटील यांनी आयुष्यभर सामाजिक सुधारणांचाच विचार केला. नुसता विचार करून ते थांबले नाहीत तर प्रत्यक्ष ते आपल्या परीने कृतीत आणण्याचा सातत्याने प्रयत्नही केला. समाजातील अनिष्ठ रुढींना तिलांजली देताना त्यांना बरीच टीका-टीपणी सहन करावी लागली. 1961 साली एका सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा एका विधवेच्या हस्ते त्यांनी करून घेतली म्हणून लोक भयंकर चिडले. देव भ्रष्ट झाला असे सांगत लोकांनी त्यांच्यावर शेण फेकले, पण त्याची त्यांनी कधी पर्वा केली नाही. लोक काय म्हणतील यापेक्षा लोकांना परिवर्तनाच्या दिशेने कसे नेता येईल, त्यांच्या जुन्या बुरसटलेल्या विचारांपासून त्यांना परावृत्त कसे करता येईल हेच ते पाहत असत. समाजात विधवेलाही सन्मान मिळाला पाहिजे, त्यांनाही सार्वजनिक ठिकाणी देवपूजेची संधी मिळायला हवी ही त्यांची भावना होती. समाजात श्रद्धेशी निगडित असलेल्या अनेक अनिष्ट प्रथा, परंपराचे मूळ हे आदिमकालीन आहे. त्यामुळे सद्द्याच्या वर्तमानात रेंगाळलेल्या या प्रथा म्हणजे आदिम श्रद्धेचे पुरावशेष आहेत, असे ते नेहमी सांगत.

शेकापच्या माध्यमातून त्यांनी अनेक राजकीय पदे भूषविली. ते 13 वर्षे रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य होते. शिवाय रायगड जिल्हा सहकारी बोर्डाचे अनेक वर्ष चेअरमनही होते. सहकार क्षेत्रातील त्यांचे काम पाहून पुढे त्यांची कोकण विभागातून पश्चिम महाराष्ट्र सहकारी बोर्डाचे संचालक म्हणून निवड झाली. त्यामुळे त्यांचा लोकसंपर्क वाढला. 1975-76 साली उरण परिसरात ओएनजीसी आली व या प्रकल्पासाठी जमिनी ताब्यात घेण्यास सुरुवात झाली. त्या वेळी उरणमधील शेतकर्‍यांनी उग्र आंदोलन केले. त्या आंदोलनात नानासाहेब, त्यांचे बंधू काका पाटील अग्रभागी होते. त्यांच्यावर सरकारने 13 केसेस दाखल केल्या. शेवटी तत्कालीन आमदार दि. बा. पाटील व दत्ता पाटील यांनी जिल्हाधिकारी अरुण भाटिया यांच्याशी चर्चा करून या ओएनजीसी प्रकल्पात स्थानिक 200 जणांना नोकर्‍या मिळवून दिल्या. त्यामुळे या परिसराला थोडे आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले. 1984च्या उरण येथे झालेल्या शेतकर्‍यांच्या जमिनी बचाव आंदोलनात त्यांचा प्रमुख सहभाग होता. या आंदोलनात पोलिसांना चकवा देण्यासाठी नागावातील आंदोलकांनी काढलेल्या लग्नाच्या वरातीचे नेतृत्व नानासाहेबांनीच केले होते. पोलिसांना जेव्हा ही वरात बनावट असल्याचे समजले. तेव्हा पोलिसांनी त्या वरातीवर बेछूट लाठीमार केला. त्यात नानासाहेब जबर जखमी झाले. या आंदोलनात त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला. ते सच्चे नेते होते, पण ते आयुष्यभर नेतेपणापेक्षा कार्यकर्त्यांच्या भूमिकेतच अधिक वावरले. शिवाय राजकारणापेक्षा त्यांचा समाजकारणाकडे जास्त कल होता.   

अखिल आगरी समाज परिषदेच्या प्रत्येक सभा, बैठका, कार्यक्रमाला ते आवर्जून उपस्थित राहत. त्यात आपली मते प्रांजळपणे मांडत. पनवेल उरण आगरी समाज मंडळाचे ते उपाध्यक्ष होते. आगरी परिषदेच्या जुन्या जाणत्या नेत्यांविषयी त्याच्या मनात अपार श्रद्धा होती. परिषदेचे पहिले अध्यक्ष दिवंगत कॉ. जी. एल. पाटील यांचा उरण येथे पुतळा बसवून घेण्यासाठी व त्यानंतर दरवर्षी त्यांच्या 10 जून रोजी येणार्‍या पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रम घडविण्यासाठी ते सातत्याने परिश्रम घेत असत. त्यांचा नि माझा गेल्या 30-35 वर्षांपासूनचा परिचय होता.

सन 1995 साली आम्ही अखिल आगरी समाज परिषदेच्या वतीने लोकनेते दि. बा. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आगरी दर्पण मासिकाची निर्मिती केली, त्या वेळी नानासाहेबांचेही आम्हाला बहुमोल सहकार्य लाभले. ते या मासिकासाठी सतत लेखन करीत. त्यांचे लेखन अभ्यासपूर्ण व व्यासंगशील लेखनाची साक्ष देणारे होते. एकदा मी त्यांना म्हणालो, नानासाहेब, तुमच्या लेखांचं एखादं चांगलं पुस्तक करता येईल! तुमची परवानगी असेल तर मी ती जबाबदारी घेईन. ते प्रसन्नतेने हसले व म्हणाले, थोडे दिवस थांबा, मग बघू! पण ते थोडे दिवस आता कधीच न संपणारे झाले. असे हे नानासाहेब. उरणला त्यांच्या पाटील वाडीत गेलो की मनसोक्त गप्पा मारीत. जुन्या आठवणींना उजाळा देत. समाजात नव श्रीमंतांचा जो वर्ग निर्माण झाला आहे, त्याचा त्यांना आनंद होता परंतु या वर्गामुळे सद्य परिस्थितीत हळदी समारंभाला जे विकृत स्वरुप प्राप्त होतंय त्याची त्यांना खंत होती. ही खंत ते वेळोवेळी बोलून दाखवत असत. त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांची लग्ने अगदी साध्या पद्धतीने लावली. आपले धाकटे बंधू काका पाटील यांचा विवाह 26 जानेवारी 1986 साली रोजी रजिस्टर पद्धतीने करुन पनवेल कॉलेजला त्या वेळी 12 हजार रुपयांची देणगी नानासाहेबांनी दि. बा. पाटील यांच्याकडे दिली. दि. बा. यांच्यामुळेच 26 जानेवारीला सुटी असूनही रजिस्टार हे लग्न लावून घेण्यासाठी कार्यालयात हजर होते. असे हे नाना! समाजात वावरताना अनिष्टाचा त्याग करून इष्टाचा स्वीकार करण्यासाठी प्रत्येकाने आपली विवेकवृत्ती जागृत ठेवायला हवी, असे ते नेहमी सांगत. त्यांची ही शिकवण समाजात रुजवणं हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल! दुर्दैवाने त्यांचा अंत अशा परिस्थितीत झाला की त्यांचे अंत्यदर्शनही आम्हाला घेता येऊ शकले नाही. त्यांची शेवटची इच्छा देहदान करण्याची होती, पण कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांना तेही करणं शक्य झाले नाही. स्वर्ग, नरक, कर्मकांड यावर तर त्यांचा मुळीच विश्वास नव्हता. विश्वास होता तो माणसांच्या कर्तृत्वावर, माणुसकीवर आणि माणसांमधल्या देवत्वावर! हा विचार घेऊनच ते जगले व समाज जागविण्याचा प्रयत्न केला. अशा या समाजसुधारकाला आमची भावपूर्ण श्रद्धांजली!

-दीपक म्हात्रे, संपादक, आगरी दर्पण

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply