Breaking News

रायगड जिल्ह्यात कोरोनाचे थैमान

पनवेलपासून पोलादपूरपर्यंत 54 नवे रुग्ण, तिघांचा मृत्यू; एकूण कोरोनाबाधित सातशेपार

पनवेल : रायगड जिल्ह्यात कोरोनाचे संक्रमण दिवसागणिक वाढू लागले असून, शनिवारी (दि. 23) एकाच दिवसात जिल्ह्यामध्ये तब्बल 54 रुग्ण आढळले. यामध्ये पनवेल महापालिका हद्दीतील 19, पनवेल ग्रामीण आठ, माणगाव 14, रोहा पाच, पोलादपूर तीन, मुरूड दोन, उरण, पेण, तळा येथील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 707वर पोहोचला आहे, तर दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू झाल्याने बळींची एकूण संख्या 33वर गेली आहे.
श्रीवर्धनमध्ये दोन मृतांसह तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह
श्रीवर्धन : श्रीवर्धन तालुक्यात दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, त्यांच्यासोबत एका तरुणीचा कोरोना रिपोर्टही पॉझिटिव्ह आला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही व्यक्ती मुंबईतून मूळ गावी परतलेल्या आहेत.
श्रीवर्धन तालुक्यात मागील महिन्यामध्ये भोस्ते गावातील पाच व्यक्तींना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. उपचारानंतर ते बरे होऊन घरी परतले. त्यानंतर तालुक्यात कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. सध्या मुंबई येथून मूळ गावी येणार्‍यांची संख्या खूप आहे. अशाच प्रकारे खार येथून 55 वर्षीय व्यक्ती 17 मे रोजी कुटुंबासह वडवली गावात आली होती. या व्यक्तीचे दुसर्‍याच दिवशी अकस्मिक निधन झाले, तर खुजारे गावात प्रभादेवी येथून 62 वर्षीय व्यक्ती मुलगी व दोघे नातलग आले होते. यातील वृद्ध व्यक्तीचे 19 मे रोजी निधन झाले. दोन व्यक्तींचा मृत्यू संशयास्पद असल्याने त्यांची मृत्यूपश्चात कोरोना टेस्ट करण्यात आली, त्याचप्रमाणे वडाळा येथून 23 वर्षीय तरुणी आई-वडील व दोन भावंडांसमवेत 15 मे रोजी दिघी गावात आली होती. या तरुणीला ताप, खोकल्याचा त्रास जाणल्याने तिला श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवून तिचाही स्वॅब घेण्यात आला. या तिघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
दोघे मृत आणि एका नवीन रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे, तर वडवली, खुजारे व दिघी गावांच्या सीमा सील करण्यात आल्या असून, बोर्ली पंचतन बाजारपेठही खबरदारी म्हणून बंद करण्यात आली आहे.
तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता आठ झाली असून, यातील पाच जण बरे झालेत, तर दोन व्यक्तींचा अहवाल येण्याआधीच मृत्यू झालेला आहे.
पनवेल तालुक्यात तीन बळी, 27 नवे रुग्ण
पनवेल : पनवेल महापालिका हद्दीत शनिवारी (दि. 23) कोरोनाचे 19 रुग्ण आढळले असून, कामोठे येथील एका महिलेचा मृत्यू झाला, तर ग्रामीणमध्ये आठ नवीन रुग्णांची नोंद होऊन दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पाली देवद (सुकापूर) आणि उमरोली येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. तालुक्यात कोरानाबाधितांची संख्या आता 493 झाली असून, 21 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
महापालिका क्षेत्रात कामोठे 10, कळंबोली चार, खारघर तीन, नवीन पनवेल आणि खांदा कॉलनीतील प्रत्येकी एक असे 19 नवीन रुग्ण आढळले असून, 14 व्यक्तींनी कोरोनावर मात केली आहे, तर ग्रामीण भागात 10 जण बरे झाले.
महापालिका क्षेत्रात कामोठे सेक्टर 3 ई येथील बिल्डींग नंबर 15मधील 37 वर्षांच्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे, तर एकट्या कामोठ्यात 10 नवीन रुग्ण आढळले. त्यापैकी सेक्टर 12 येथील पुष्प संगम सोसायटीतील एकाच घरातील तीन व्यक्तींचा समावेश आहे. सेक्टर 22 येथील साई प्राईडमधील रहिवासी व मुंबई महापालिकेत अभियंता असलेल्याच्या घरातील दोघांचा समावेश आहे. अन्य रुग्णांमध्ये बेस्टमध्ये चालक, पोलीस आणि कुर्ला नागरी सहकारी बँकेतील कर्मचारी आहे. नवीन पनवेल सेक्टर 12 येथील सन स्टोन अपार्टमेंटमधील रहिवासी व हिंदुजा हॉस्पिटलमध्ये टेक्निशियन असलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  
खांदा कॉलनीतून सानपाडा येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जाणार्‍या महिलेला तेथे संसर्ग झाला आहे. 
खारघर येथील रहिवासी व वडाळा रोडला पोलीस उपनिरीक्षक असलेल्या आणि महापालिकेत सफाई कामगाराला कोरोनाची लागण झाली आहे. एका महिला हॉस्पिटलमध्ये गळ्यावरील गाठीवर उपचार घेण्यासाठी गेली असता, तिला संसर्ग झाला आहे. कळंबोली सेक्टर 3 येथील लॉजिस्टिक कंपनीत कामाला असणार्‍या व्यक्तीला आणि त्याच्या कुटुंबातील सदस्याला कोरोनाची लागण झाली आहे. सेक्टर 17मधील दोन पोलिसांना कोरोना झाला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात नागरिकांच्या 2221 टेस्ट होऊन 351 रुग्ण आढळले. त्यापैकी 196 जणांनी कोरोनावर मात केली असून, 50 जणांचे रिपोर्ट अद्याप मिळालेले  नाहीत, तर 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
पनवेल ग्रामीणमध्ये शनिवारी आठ नवीन रुग्ण आढळले असून, उमरोली येथील ग्रीन रिव्हर साईटमधील 64 वर्षीय व्यक्ती आणि पाली देवद (सुकापूर) येथील निम्बेश्वर कुंज मधील 68 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. चिपळे तीन, करंजाडे दोन, तर पाली देवद (सुकापूर), आष्टे आणि विचुंबे येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली आहे. चिपळे येथील महिला बॉम्बे हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी दाखल झाली असताना दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. ग्रामीण भागात 363 टेस्ट घेण्यात आल्या असून, 57 टेस्टचे रिपोर्ट बाकी आहेत. आतापर्यंत 142 रुग्ण आढळले. त्यापैकी 74 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून,  पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 63 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
माणगाव तालुक्यात 11 नवे कोरोनाग्रस्त
माणगाव : माणगाव तालुक्यात कोरोनाच्या नवीन 11 रुग्णांची भर पडली असून, एकूण आकडा 24वर पोहोचला आहे.
नव्या रुग्णांत मुठवली तर्फे तळे तीन, तर खर्डी, कळमजे, नगरोली, कविळवहाळ बु., पळसगाव, सणसवाडी व पन्हळघर खु. व कालवण येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.
रोह्यात कोरोनाची एण्ट्री; पाच रुग्ण आढळले
रोहे : रोहा तालुक्यातही कोरोनाने शिरकाव केला असून, पाच रुग्ण आढळून आले आहेत. यात ऐनवहाळ येथील तीन व भालगाव येथील दोन व्यक्तींचा समावेश असल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली.
रोहा तालुक्यात आढळलेले पाच रुग्णही मुंबईहून आलेले आहेत. कोलाड परिसरातील ऐनवहाळ येथे 16 व 17 मे रोजी एकूण तीन व्यक्ती भांडूप येथून आल्या होत्या. त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते, मात्र खोकल्याचा त्रास होत असल्याने त्यांचे स्वॅब तपासणीसाठी मुंबई येथे पाठविण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णांना उपचारासाठी अलिबाग येथे नेण्यात आले आहे. ऐनवहाळ येथे आढळलेल्या रुग्णांमध्ये 65 वर्षीय महिला, 48 वर्षीय व्यक्ती व 26 वर्षांचा तरुण यांचा समावेश आहे.
भालगाव येथे आढळलेल्या रुग्णांमध्ये प्रत्येकी एक महिला व पुरुषाचा समावेश आहे. दोघांचेही वय 50 वर्षांच्या पुढे आहे. हे दोघे लालबाग येथून आलेले आहेत. त्यांनाही उपचारासाठी अलिबाग येथे नेण्यात आले आहे.

Check Also

शरद पवार गटातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले भाजपमध्ये स्वागत

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल मतदार संघात आमदार प्रशांत ठाकूरांनी केलेल्या विकासकामांवर आणि त्यांच्या कार्यप्रणालीवर …

Leave a Reply