कर्मचार्यांच्या नाकी नऊ
माणगाव ः प्रतिनिधी – कोरोना महामारीच्या संकटात देशात लॉकडाऊन सुरू आहे. या काळात सर्वच कार्यालये बंद आहेत. केवळ बँका, सरकारी कार्यालये व अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. काही कंपन्या, बँकांनी आपल्या कर्मचार्यांना वर्क फ्रॉम करण्याची मुभा दिली आहे, मात्र नेटवर्कच्या समस्येमुळे वर्क फ्रॉम होम करण्यास कर्मचार्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने मुंबई, पुण्यासारख्या शहरांतून सुरक्षेचा उपाय म्हणून अनेक बँका, कंपनीतील कर्मचारी कुटुंबासह आपापल्या गावी परतले आहेत. हे कर्मचारी गावी येऊन सार्वजनिक सभागृह, शाळा व रिकाम्या घरातून विलगीकरणात राहिले आहेत, मात्र आपापल्या कार्यालयांची वर्क फ्रॉम होमच्या कामाची पूर्तता करता करता या कर्मचार्यांच्या नाकी नऊ येत आहेत. विविध कंपन्यांचे सिमकार्ड वापरूनही नेटवर्क मिळत नाही. मोठ्या प्रमाणात डाटा संपत आहे. केलेले काम अपलोड होत नाही. काही डाऊनलोड करायचे असेल तरी खूप वेळ जात असून गावी आलेले कर्मचारी नेटवर्कमुळे अडचणीत सापडले आहेत. अनेकांनी तर दिवसा कामे होत नाही म्हणून रात्री जागून काम करण्याचा प्रयत्न केला, मात्र रात्रभर जागूनही नेटवर्क मिळत नसल्याने वर्क फ्रॉम होम अडचणीत आले आहे.