Breaking News

पनवेलमध्ये भात खरेदीला गुरुवारपासून सुरुवात

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा

पनवेल : रामप्रहर वृत्त
शासकीय आधारभूत पनवेल भात खरेदी केंद्रावर गुरुवार (दि.8)पासून भात खरेदीला अधिकृतरित्या सुरुवात होणार असून, त्यामुळे परिसरातील भात उत्पादक शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळेवर भात खरेदी सुरू व्हावी यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही प्रक्रिया सुरू होत असल्याने भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांनी शेतकर्‍यांच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर तसेच संबंधित शासकीय अधिकार्‍यांचे आभार मानले आहेत.
दरवर्षी भात खरेदीला विलंब झाल्यास शेतकर्‍यांचा भात घरातच साठवून ठेवावा लागतो. त्यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊन शेतकर्‍यांना मोठ्या चिंतेला सामोरे जावे लागते. त्या संदर्भात शेतकर्‍यांनी आपली व्यथा आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे मांडली. ही परिस्थिती लक्षात घेऊन आमदार प्रशांत ठाकूर यांनी तत्काळ भात खरेदी प्रक्रिया वेळेत सुरू करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना दिल्या. त्या अनुषंगाने सदरच्या गोदामातील माल खाली होण्यास सुरुवात केली असून उद्यापासून शेतकर्‍यांच्या भात खरेदीला सुरुवात करण्याचे जिल्हा पणन अधिकारी ताटे यांनी आश्वासित केले.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पुढाकारामुळे पनवेल तालुक्यातील शेतकर्‍यांसाठी भात खरेदीचा मार्ग मोकळा झाला असून, शेतकर्‍यांना हमीभावाने भात विक्री करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या निर्णयामुळे शेतकर्‍यांना आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार असून, शासनाच्या आधारभूत दर योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकर्‍यांना मिळणार आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply