नवी मुंबई : बातमीदार
नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील प्रथम संदर्भीय रुग्णालयातील रुग्णवाहिका चालवणार्या व्यक्तीचा कोरोनामुळे रविवारी (दि. 24) मृत्यू झाला. विशेष म्हणजे या चालकाला अन्य कोणताही आजार नव्हता.
मृत पावलेल्या चालकावर कोरोनाच्या महामारीत मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात कोविड-19ची लागण झालेल्या रुग्णांना नेण्याची जबाबदारी होती. त्याच्यात कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यावर चाचणी केली असता रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. या चालकावर वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात उपचार सुरू होते, मात्र त्याचा रविवारी मृत्यू झाला. त्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.
माणगाव तालुक्यात आणखी पाच रुग्ण
माणगाव : प्रतिनिधी
माणगाव तालुक्यातील पाच जणांचे कोरोना रिपोर्ट शनिवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले. त्यामुळे तालुक्यातील एकूण रुग्णसंख्या 29 झाली आहे. मूर गावात तीन, तर कोस्ते बु. व रिळे येथे प्रत्येकी एक असे पाच नवीन रुग्ण आढळले आहेत, अशी माहिती प्रांताधिकारी प्रशाली जाधव-दिघावकर यांनी दिली.