Breaking News

रायगड जिल्ह्यात 50 नवे कोरोना रुग्ण

पनवेल : रामप्रहर वृत्त

रायगड जिल्ह्यात रविवारी (दि. 24) सलग दुसर्‍या दिवशी मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळले असून, नव्या 50 कोरोनाबाधितांमुळे जिल्ह्याचा आकडा 757वर पोहचला आहे. पनवेल महापालिका 20, पनवेल ग्रामीण नऊ, उरण 10, माणगाव पाच, कर्जत तीन, अलिबाग दोन आणि पोलादपूर एक असे रुग्ण आढळून आले आहेत.

पनवेल तालुक्यात 29 नवीन रुग्णांची नोंद; 25 जणांची कोरोनावर मात

पनवेल : प्रतिनिधी

महापालिका क्षेत्रात रविवारी (दि. 24) कोरोनाचे नवे 20 रुग्ण आढळले असून, 12 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर पनवेल ग्रामीणमध्ये नऊ नव्या रुग्णांची नोंद झाली व 13 रुग्णांनी कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाचे 522  रुग्ण झाले असून, 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

महापालिका क्षेत्रात कामोठे येथे 11, नवीन पनवेल सहा, तर नावडे फेज-2, तळोजा, ओवेपेठ आणि पनवेल तक्का येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. कामोठ्यात एकाच घरातील पाच जणांना कोरोनाची लागण झाली आहे. ग्रामीणमध्ये उलवे येथील एकाच कुटुंबातील तीन महिला व एका पुरुषाला कोरोना झाला आहे. 

कामोठे सेक्टर 35मधील रिद्धी-सिद्धी सोसायटीतील एकाच कुटुंबातील पाच जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.   या कुटुंबातील महिला शताब्दी हॉस्पिटलमध्ये नर्स असून, तिच्यापासून हा संसर्ग झाला आहे. सेक्टर 8 येथील शुभम कॉम्प्लेक्स आणि सेक्टर 9 कृष्ण कुंजमधील कुटुंबांच्या घरातील प्रत्येकी दोघांना कुटुंबप्रमुखापासून संसर्ग झाला आहे. सेक्टर 21 सुरभी सोसायटीतील रहिवासी व वडाळा डेपोतील उपअभियंता असलेली व्यक्ती आणि सेक्टर 10मधील एका व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाला आहे.

नवीन पनवेलमधील सहा व्यक्तींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सेक्टर 5 एमधील हरी महल सोसायटीतील एकाच कुटुंबातील तीन जणांना कुटुंबप्रमुखापासून संसर्ग झाला आहे. सेक्टर 16 क्लासिक कल्पतरूमधील रहिवासी असलेल्या बस डेपो निरीक्षकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे. सेक्टर 13 येथील ए टाइपमधील दोन व्यक्तींना  लागण झाली असून, यापूर्वी या भागात अनेकांना कोरोना झाला आहे.

तळोजा ओवेपेठ येथील 55 वर्षीय महिला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जात होती. तिला संसर्ग झाला आहे. पनवेल तक्का  येथील मोराज रिव्हर साइडमधील तापी इमारतीतील मुंबईला सफाई कामगार असलेली व्यक्ती आणि नावडे फेज-2मधील उरण जेएनपीटीमध्ये कामाला असलेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रात नागरिकांच्या आतापर्यंत 2273  टेस्ट झाल्या असून, 371 रुग्ण आढळले. त्यापैकी 208 जणांनी कोरोनावर मात केली. 22 जणांचे रिपोर्ट मिळाले नाहीत, तर 16 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

पनवेल ग्रामीणमध्ये उलवे नोड सेक्टर 19 येथील उन्नती अपार्टमेंटमधील एकाच घरातील तीन महिला आणि एका पुरुषाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. या घरातील कुटुंबप्रमुखाला यापूर्वीच कोरोनाची लागण झाली आहे. आदई येथील रहिवासी असलेल्या मुंबई पोलिसाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. विचुंबे, उसर्ली खुर्द आणि करंजाडेमधील चामुंडा हिल येथील प्रत्येकी एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत 372 टेस्ट करण्यात आल्या. त्यापैकी 28 टेस्टचे रिपोर्ट बाकी आहेत. 151 रुग्णांचे निदान झाले असून, त्यापैकी 82 रुग्णांनी कोरोनावर मात केली. पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 59 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

उरण तालुक्यात नऊ कोरोनाबाधितांची भर

उरण : वार्ताहर, प्रतिनिधी

उरण तालुक्यात कोरोनाचे नऊ नवीन रुग्ण रविवारी

(दि. 24) आढळले. नव्या रुग्णांमध्ये करंजा येथील पाच, आवरे दोन, तर नागाव व पागोटे येथील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 146 झाली आहे. पाच नव्या रुग्णांमुळे एकट्या करंजातील कोरोनाबाधितांची संख्या 126 झाली आहे. यापैकी 88 बरे झाले असून, 38 रुग्ण उपचार घेत आहेत, तर तालुक्यातील 96 रुग्ण बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून, 50 रुग्ण उपचार घेत आहेत. रविवारी आढळलेल्या नऊ रुग्णांना पनवेल येथील कोविड (उपजिल्हा) रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply