Breaking News

कोरोनाचे संमिश्र चित्र

जगभरात अनेक देशांमध्ये सध्या काही महिन्यांच्या कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर दोन टोकाची परिस्थिती दिसते आहे. एकीकडे नित्य नव्याने वाढत चाललेले केसेसचे आकडे तर दुसरीकडे अर्थव्यवस्थांना चालना देण्यासाठी व्यवहार खुले केले जाण्याच्या उपाययोजना, या दोन्हींच्या पार्श्वभूमीवर काही ठिकाणी लोक सुयोग्य खबरदारी घेऊन वागत आहेत तर काही ठिकाणी बेपर्वाईने गर्दीही केली जाताना दिसते आहे.

कोरोनाचा जगभरातला प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून विशेषत: अमेरिकेतल्या संबंधित आकडेवारीने सगळ्यांनाच अचंबित केले. आजही अमेरिकेतले कोरोनासंबंधी आकडे धडकी भरवणारेच आहेत. यंदाची आठवडाअखेर अमेरिकेकरिता खास होती कारण सोमवारी तिथल्या रिवाजानुसार मेमोरिअल डे होता. मेमोरियल डे म्हणजे अमेरिकी लष्करात सेवा बजावताना हौतात्म्य आलेल्या वीर सैनिकांच्या स्मृती जागवण्याचा दिवस. या दिवसापासून अमेरिकेत समर सीझनला अर्थात उन्हाळ्याला सुरूवात होत असल्याने लोक बाहेर पडून मौजमजा करतात. यंदा देशातील कोरोनाच्या अतिशय निराशाजनक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अनेकांनी बाहेर जाण्याचे टाळले तर अमेरिकेतल्या काही राज्यांत मात्र लोकांनी खबरदारीला पूर्णपणे धुडकावून लावत समुद्रकिनारी तुडुंब गर्दी केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वत:देखील या दिवशी प्रथमच आपल्या खाजगी क्लबमध्ये जाऊन गोल्फ खेळले. देशात कोरोनाच्या केसेस वाढू लागल्यापासून ते गोल्फकडे वळले नव्हते. अर्थात क्लबच्या वाटेवर काही निदर्शकांनी त्यांना निषेधाचे फलक दाखवलेच. अमेरिकेतील कोरोना बळींची संख्या आता एक लाखाच्या समीप जाऊन पोहोचली आहे. अमेरिकेनजीकच्या ब्राझीलमध्येही कोरोना केसेसचे प्रमाण वेगाने वाढत असल्याने अमेरिकेने ब्राझीलमधून अमेरिकेत येणार्‍या प्रवाशांना रोखणारे निर्बंध लादले आहेत. याच सुमारास आपल्या देशात मात्र पुरेशी खबरदारी घेत देशांतर्गत हवाई वाहतूक सुरू करण्यात आली आहे. तब्बल दोन महिन्यांच्या काळानंतर हवाई सेवा उपलब्ध झाल्याने अर्थातच लोकांकडून तिला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोमवारीच देशातील बहुतेक राज्यांमध्ये रमजान ईदही साजरी करण्यात आली. मुस्लिम समाजाने निर्बंधांचे पालन करीत ईदचा सण साजरा केला याचे कौतुक करायलाच हवे. अनेकांनी कपडे वा भेटवस्तू यांच्यावर खर्च करण्याऐवजी गोरगरिबांना मदत करीत समाजाला परिस्थितीचे भान असल्याचे व संवेदनशीलतेचे दर्शन घडवले. महाराष्ट्रातील अकोला येथे तर एका मुस्लिम तरुणाने एका कोरोनाबाधित हिंदु व्यक्तीवर अंत्यसंस्कार करून आगळा आदर्शही समोर ठेवला. संबंधित व्यक्ती ही ज्येष्ठ नागरिक होती व त्यांच्या स्वत:च्या मुलाने कोरोनाच्या भीतीपोटी त्यांच्याकडे पूर्णपणे पाठ फिरवली होती. कोरोना फैलावाच्या पार्श्वभूमीवर जगभरात सगळीकडेच मानवी स्वभावाच्या टोकाच्या स्वरुपाचे दर्शन घडते आहे. सिंगापूर येथेही एका भारतीयाने ईदच्या निमित्ताने असंख्य मजुरांना बिर्याणीचे वाटप केले. देशांदेशांतील कोरोनासंबंधित परिस्थितीमध्ये बराच फरक असला तरी बहुतेक सगळीकडेच जनजीवन पूर्ववत करण्याचे प्रयास सुरू असल्याचे दिसते आहे. कोरोनाचा कहर पाहिलेल्या युरोपातही सध्या उन्हाळ्याच्या आगमनाच्या निमित्ताने हॉटेल्स सुरू करण्यावर भर दिला जातो आहे. दरम्यान अद्यापही काही ठिकाणी कोरोनाच्या केसेस वाढतच असल्याचा इशारा ब्रिटनने दिला आहे. जपानमध्ये मात्र सरकारने कोरोनामुळे उद्भवलेली आणीबाणीसदृश परिस्थिती संपल्याचे जाहीर केले आहे. जगाच्या कुठल्याही कोपर्‍यात का असेना, कोरोनाच्या विळख्यातून माणसांची सुटका होते आहे हे पाहून निश्चितच इतरांना हवाहवासा वाटणारा दिलासाच मिळतो.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply