अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पनवेल येथील वडाले तलाव येथे स्वामी विवेकानंदांचे स्मारक उभे राहावे, अशी मागणी पनवेल महानगरपालिकेकडे करण्यात आली होती. ही मागणी मान्य केली असली तरी यासंदर्भात प्रस्ताव सादर करून स्मारकाच्या कामाला गती मिळावी, यासंदर्भात परिषदेच्या पदाधिकार्यांनी सभागृह नेते परेश ठाकूर यांची भेट घेत निवेदन दिले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पनवेल महानगर मंत्री वैष्णव देशमुख व सहमंत्री मयूर साबळे यांनी पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर व महानगरपालिका अधिकारी यांच्या वडाळे तलाव पाहणी दौर्यादरम्यान भेट घेत निवेदन दिले. या वेळी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी याबाबत महासभेत ठराव मंजूर करून महापुरुषांच्या स्मारकाबाबत असलेल्या सर्व आवश्यक त्या परवानग्या गृहविभाग, कला संचालनालय यांच्याकडून घेत लवकरात लवकर स्वामी विवेकानंदांचे स्मारक बनवण्यात येईल, असे आश्वस्त केले.
या वेळी नगरसेविका रूचिता लोंढे, नगरसेवक नितीन पाटील, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, चिन्मय समेळ आदी उपस्थित होते.