Breaking News

पनवेल शहरात मानाच्या नवनाथ सांप्रदायातील मंडळींकडून घरगुती पारंपरिक जन्माष्टमी उत्सव

पनवेल : रामप्रहर वृत्त

येथे शहरात मानाच्या 10 ते 12 ठिकाणी नवनाथ संप्रदायातील मंडळींकडून घरगुती स्वरूपात मोठ्या उत्साहात पारंपरिक जन्माष्टमीच्या उत्सवाचे आयोजन केले जाते, मात्र यंदाचा हा उत्सव कोरोनामुळे साधेपणाने साजरा करण्यात आला. पनवेल शहरामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा करण्याची शेकडो वर्षांपासूनची प्रथा आणि परंपरा आजही कायम आहे. पनवेलला सांस्कृतिक आणि पारंपरिक वारसा लाभला आहे.

गोकुळाष्टमी म्हटले की डोळ्यासमोर उभे राहतात त्या उंचच उंच दहीहंड्या, डीजेच्या तालावर थिरकणारी तरुणाई आणि बक्षिसांची चढाओढ, परंतु गेल्या दोन वर्षांपासून या आनंदोत्सवावर कोरोनामुळे विरजण पडले आहे. असे असले तरीही पनवेलमध्ये सुमारे तीनशे ते साडेतीनशे वर्षांपासून श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याची प्रथा आजही कायम आहे.

श्रावण कृष्ण प्रतिपदेपासून या उत्सवाला सुरुवात होते. जन्माष्टमीच्या दिवशी पूजा आरती झाल्यानंतर मानाचे ‘अस्थान’ म्हणजेच नवनाथांचे स्थान असलेली मंडळी अस्थानाबाहेरील रस्त्यावर येतात. या वेळी त्यांच्या अंगावर आसुडाचे फटकारे मारले जातात, परंतु हे आसुडाचे फटकारे शिक्षा नसून भगवंताचा प्रसाद मानले जातात. जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी म्हणजे गोपाळकाल्याच्या दिवशी कमी उंचीवर बांधलेली दहीहंडी हाताने किंवा काठीने फोडली जाते. गेली अनेक वर्षे आजूबाजूच्या परिसरातील नागरिक या उत्सवात सहभागी होत असतात, परंतु यंदा कोरोनाच्या संकटामुळे मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत ही प्रथा साजरी झाली. कोणताही धांगडधिंगा न करता धार्मिक पूजाअर्चा आणि प्रथेप्रमाणे रुढी परंपरेचा वारसा पुढे नेणारी पनवेल शहरातील सण उत्सव साजरे करण्याची ही प्रथा आदर्शवत मानली जाते.

दरवर्षी सार्वजनिक दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येते. ठिकठिकाणाहून अनेक गोविंदा पथके हंडी फोडण्यासाठी येत असतात, परंतु गेल्या वर्षीपासून कोरोनाचा प्रादूर्भाव असल्याने यंदाही साईतेज प्रतिष्ठानतर्फे दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आला आहे. कोरोनाचा प्रसार वाढू नये हेच यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. सर्व गोविंदांनी सुरक्षित राहावे, काळजी घ्यावी. कोरोनाचे संकट पूर्णपणे दूर व्हावे आणि पूर्वीप्रमाणे सण उत्सव उत्साहात साजरे करता यावेत हीच प्रार्थना.

-नगरसेवक तेजस कांडपिळे, साईतेज प्रतिष्ठान दहीहंडी उत्सव आयोजक

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply