महाडमध्ये दोन नवे रुग्ण
महाड : प्रतिनिधी
महाड तालुक्यात देखील आता मुंबईमधून आलेल्या नागरीकांमधुन कोरोनाचे रुग्ण समोर येऊ लागले आहेत. कोरोनाची लक्षणे दिसणार्या दोन रुग्णांचे रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटीव्ह आले आहे. या रुग्णांवर पनवेल येथे उपचार सुरू आहेत.
मुंबई पुण्यातून मोठ्याप्रमात नागरीक महाडमध्ये आले असुन, या लोकांच्या बेजबदार पणे वागण्याने महाड तालुक्यातील कोरोनाच्या प्रसाराचा धोका वाढला आहे. पैकी मुंबई मधून आलेल्या वडघर आणि रायगड वाडी येथील दोन पुरुषांन कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने त्यांना दोन दिवसांपूर्वी खारघर येथे आयसुलेट करण्यात आले होते. याच ठिकाणी त्यांच्या तपासणी चे नमुने घेण्यात आले होते. या तपासणीचा शुक्रवारी अहवाल आला असुन या दोन्ही रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
महाड कोव्हीड केअर सेंटर मध्ये या आधीच आठ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असल्यामुळे या नव्या दोन्ही रुग्णांना पनवेल येथील एमजीएम रुग्णांलयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मुंबई पुण्यातून आलेल्या नागरीकांन मुळे महाडमध्ये कोरोनाचा धोका वाढला आहे.
माणगावात तीन पॉझिटिव्ह; एकूण रुग्ण 38वर
माणगाव : प्रतिनिधी
माणगाव तालुक्यात कालवण गावांमध्ये दोन तर निजामपूर विभागातील कोंडेथर गावांत एक असे एकुण तीन नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यांचा स्वॅब रिपोर्ट शुक्रवारी (दि. 29) सकाळी आल्याची माहिती माणगाव तालुक्याच्या तहसीलदार प्रियंका आयरे कांबळे यांनी दिली. तालुक्यात एकूण कोरोना बाधितांची संख्या 38 वर पोहचली असल्याचेही त्यांनी सांगितले.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात माणगाव तालुक्यात दरदिवशी कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने आता तालुक्यातील लोकांनी धास्ती घेतली असून सर्वत्र चिंताग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. माणगाव तालुक्यातील आतापर्यंत 15 गावांत कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी कुशेडे तर्फे गोवेले गावांत सर्वाधिक नऊ रुग्ण सापडले आहेत.
प्रशासन आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेवून त्यांना लगेचच क्वारंटाईन करून त्यांची रुग्णालयातून तपासणी करून घेत असल्याची माहिती तहसीलदार प्रियंका आयरे कांबळे यांनी दिली. माणगाव तालुक्यात एप्रिल ते मे महिन्यात मुंबई व अन्य शहरांतून भरपूर लोक आपल्या गावी दाखल झाल्याने त्यांच्यातून आतापर्यंत बाधित रुग्ण पुढे येत असल्याची माहिती समोर येत असून तालुक्यातील जनतेने कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्यासाठी सरकारने केलेल्या सूचनेप्रमाणे प्रशासनाला सहकार्य करा, असे आवाहन तहसीलदार यांनी केले आहे.
पेणमध्ये पाच जण बाधित; एकूण 11 जणांना लागण
पेण : प्रतिनिधी
पेण मध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून आता रुग्णांची संख्या 11 झाली आहे. यामध्ये ग्रामीण भागात नऊ रुग्ण व पेण शहरात दोन रुग्णाची नोंद करण्यात आली आहे.
चोळे येथील पाच रुग्ण, कामार्ली येथील तीन रुग्ण, पेण शहरातील दोन रुग्ण, शिर्कीचाळ येथील एक रुग्ण अशा एकूण 11 रुग्णांचा समावेश आहे. पेण मधील नवीन रुग्णांमध्ये चोळे येथील 25 वर्षीय महिला गृहिणी, 27 वर्षीय पुरुष, 49 वर्षीय महिला, 13 वर्षीय मुलगा असे एकूण चार जण व पेण शहरातील एक रुग्ण आहे. चोळे मधील रुग्णांना पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच पेण शहरातील 28 वर्षीय महिलेला उपजिल्हा रुग्णालय पेण येथे दाखल करण्यात आले आहे. या अगोदर वडखळ येथील दोन रुग्ण बरे झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
रसायनीत आणखी दोघांना लागण
मोहोपाडा : प्रतिनिधी
रसायनीत शुक्रवारी (दि. 29) भटवाडी आणि हरिओम पार्कमधील दोन जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यामुळे आता रसायनीत एकूण कोरोनाबाधित रुग्ण संख्या 10 झाली आहे. यामध्ये कैरेजवळील एका कंपनीतील कोरोनाबाधित रुग्णाला वगळण्यात आले आहे. भटवाडी येथील व्यक्ती एमजीएम रुग्णालयात कामाला आहे. त्याला हॉस्पिटल आवारातच लागण झाल्याचे समजते तर हरिओम पार्कमध्ये राहणारा व्यक्तिला वाशी येथे कोरोनाची बाधा झाल्याचे मंडळ अधिकारी नितिन परदेशी यांनी सांगितले. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचा तपास सुरू आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.