नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
कडक संचारबंदीनंतर पनवेलसह नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे, मात्र कोरोना मृत्यूंचे प्रमाण कायम असल्याने चिंता व्यक्त होत आहे. दिवसाला सरासरी आठ ते नऊ कोरोना रुग्णांचा मृत्यू होत आहे. नवी मुंबई शहरात 50 वर्षांवरील बाधितांचे मृत्यू अधिक असून शहरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1350च्या वर गेलेली आहे. त्यात प्राणवायू पातळी कमी होत असल्याने तरुण वार्गालाही धोका वाढला आहे. एप्रिल महिन्यामध्ये सरासरी दिवसाला आठ ते नऊ मृत्यू होत आहेत. पालिका आयुक्त अभिजीत बांगर मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत, परंतु मागील काही दिवसांपासून सरासरी आठ मृत्यू होत असल्याचे दिसत आहे. शहरातील ज्येष्ठ नागरिकांची व लहान मुलांची काळजी घेण्याची गरज आहे. गृहअलगीकरणात धोका वाढला आहे.
शहरात एकीकडे उपचाराधीन रुग्णांची तसेच नव्या रुग्णांची संख्या घटत असताना दिवसाला आठ ते नऊ मृत्यू हे प्रमाण नक्कीच चिंताजनक आहे. त्यामुळे शहरातील करोनाचे मृत्यू कमी करण्यासाठी दैनंदिन बैठकीत आढावा घेऊन जास्तीत जास्त मृत्यू कमी करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे.
–अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका
…म्हणून पनवेलमध्ये अंत्यविधी सर्वाधिक
पनवेल : महापालिका हद्दीत आतापर्यंत 852 कोरोना मृत्यूंची नोंद झाली आहे. पनवेलमध्ये अंत्यसंस्कारसाठी संपूर्ण रायगडातून लोक येत असल्याने पनवेलमध्ये अंत्यविधीच्या अनेक नोंदी होत आहेत. शहरात महापालिकेच्या दोन स्मशानभूमी असून दिवसाला सरासरी 15 मृतदेहांवर अंत्यसंस्कार होत आहेत. 2,063 कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे या नोंदीत दिसून येत आहे.
नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील जे रुग्ण पनवेलमध्ये उपचारासाठी येत होते, त्यांचा मृत्यू पनवेलमध्ये झाल्यावर त्यांच्यावरही पनवेलमध्येच अंत्यसंस्कार त्यांचे नातेवाईक करत होते. त्यामुळे मृतांच्या संख्येत तफावत आढळली असेल, मात्र पनवेल पालिकेने जाहीर केलेली आकडेवारी ही पारदर्शक आहे.
–सुधाकर देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिका
RamPrahar – The Panvel Daily Paper