कर्जत ः बातमीदार
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अंगणवाड्या बंद आहेत. त्या पार्श्वभूमीवर अंगणवाड्यांत जाणारी मुले तसेच गरोदर महिलांची एका मोहिमेच्या स्वरूपात तपासणी करून अहवाल देण्यात यावा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालुक्यातील अंगणवाडीमध्ये जाणारी मुले तसेच गरोदर महिलांची विशेष तपासणी सुरू असून कर्जतचा तालुका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाच्या वतीने ही विशेष मोहीम राबविली जात आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या नावे पत्र काढून हे आदेश दिले होते. उपमुख्य कार्यकारी (महिला आणि बालविकास) अधिकारी नितीन मंडलिक यांनी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सी. के. मोरे यांनी तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतील आरोग्य अधिकार्यांनी सर्व मुलांचे वजन, उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी, असे पत्र काढले. त्यानुसार तालुक्यात 335 अंगणवाड्यांमधून कुपोषित मुले, गरोदर मातांची तपासणी सुरू झाली आहे. पुढील 20 दिवस नियमित स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यांनी दिली आहे.
तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या हद्दीतील सर्व मुलांची तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेत गरोदर माता व स्तनदा मातांचीही तपासणी व उपचार केले जाणार आहेत.
-डॉ. सी. के. मोरे, तालुका आरोग्य अधिकारी, कर्जत
जिल्ह्यातील कुपोषणाच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच आदिवासी विकास विभागाचे विशेष लक्ष आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुपोषण कमी करण्यासाठी सर्व विभाग समन्वयाने काम करीत आहेत ही जमेची बाजू आहे.
-अशोक जंगले, समन्वयक कॅन प्रकल्प, दिशा केंद्र, कर्जत