कर्जत : प्रतिनिधी
कर्जत रेल्वेस्थानकावरील फलाटावर फरशीचे टोक बाहेर आल्याने प्रवाशांना दुखापत होऊ शकते. याबाबतीत रेल्वे प्रशासनाने त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी कर्जत येथील रेल्वे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच तत्पर असलेल्या पंकज मांगीलाल ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे.
कर्जत रेल्वेस्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एक झाड आहे. त्या झाडाच्या जवळ फरशा बसविल्या आहेत. त्यातील फरशीचे टोक बाहेर आल्याने प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. एखादा प्रवासी घाईगडबडीत गाडी पकडण्यासाठी जात असेल तर त्यांना दुखापत होऊ शकते. ही बाब पंकज ओसवाल यांनी रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणली असून तेथे त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी केली आहे. रेल्वे प्रशासनाने याबाबत पंकज ओसवाल याच्या मागणीची त्वरित दखल घेऊन 15 जानेवारीपर्यंत दुरुस्ती केली जाईल, असे कळविले आहे.