पनवेल : वार्ताहर
पनवेलमध्ये एका अज्ञात वाहनाच्या ठोकरीमुळे रिक्षाचालक, गंभीररित्या जखमी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री कर्नाळा स्पोर्ट्सजवळील उड्डाणपूल परिसरात घडली आहे. एका भरधाव वाहनाची ठोकर एका रिक्षा चालकाला बसल्याने तो रिक्षामध्ये अडकून बसला होता. त्याच वेळी सामान खरेदी करण्यासाठी वडघर येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वेळासकर व त्यांचे मित्र जात असताना त्यांनी आपली गाडी थांबवून अपघात झालेल्या रिक्षाचालकाला रिक्षातून बाहेर काढले व त्वरीत पोलिसांशी संपर्क साधून या घटनेबाबतची माहिती दिली व रिक्षाचालकाला नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पमपा प्रभाग अधिकार्यांच्या बदल्या
पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांनी शनिवारी रात्री प्रभाग अधिकार्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या करून त्वरित पदभार स्वीकारण्याचे आदेश दिले आहेत. जाहिरात परवाना विभागाचे अधिकारी सदाशिव कवटे आणि नाट्यगृहाचे व्यवस्थापक अरूण कोळी यांचेकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. पनवेल महापालिकेत प्रभाग ‘अ’ खारघर, प्रभाग ‘ब’ कळंबोली , प्रभाग ‘क’ कामोठे आणि प्रभाग ‘ड’ पनवेल असे चार प्रभाग असून शनिवारी रात्री आयुक्त सुधाकर देशमुख यांनी प्रभाग ‘ड’ चे दशरथ भंडारी यांची बदली प्रभाग ‘अ’ मध्ये केली आहे. नाटयगृहाचे व्यवस्थापक अरुण कोळी यांची बदली प्रभाग ‘क’ चे प्रभाग अधिकारी म्हणून केली आहे. जाहिरात विभागाचे सदाशिव कवठे यांची प्रभाग ‘ड’ चे अधिकारीपदी, प्रभाग ‘क’ चे सुरेश गांगरे यांची पाणी कर संकलन अधिकारी म्हणून आणि प्रभाग ‘ब’ चे प्रकाश गायकवाड यांना त्यांच्या मूळ जागीच ठेवण्यात आले आहे. जाहिरात परवाना विभागाचे अधिकारी सदाशिव कवटे आणि नाट्यगृहाचे व्यवस्थापक अरूण कोळी यांना प्रभाग अधिकारी पदाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. बदली नाकारली किंवा दबाव आणल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची तंबी देखील देण्यात आली आहे.
बीसीटी महाविद्यालयातील पीपीटी स्पर्धेचा निकाल
पनवेल : रामप्रहर वृत्त
लॉकडाऊनमुळे महाविद्यालये बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांची वर्गात होणारी दैनंदीन लेक्चर्स बंद केली असली तरी पनवेलच्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या भागूबाई चांगु ठाकूर विधी महाविद्यालयाने (बीसीटी) अभिनव संकल्पनेद्वारे विद्यार्थ्यांचे ऑनलाइन लेक्चर्स सुरु करुन चालू सत्राचा सर्व अभ्यासक्रम विहीत मुदतीत पूर्ण केला आहे.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या विधी महाविद्यालयाने, एकमेकांमध्ये अंतर पाळण्याचे उद्दिष्ट साधतानाच, वर्क फ्रॉम होम ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे. आधुनिकीकरण आणि संगणकीकरणामुळे अनेक मिटींग तसेच लेक्चर्समध्ये एखाद्या मुद्याचे सुयोग्य स्पष्टीकरण देण्यासाठी पॉवर पॉईंट प्रेसेंटेशनचा वापर केला जातो आणि त्यामुळेच या लॉकडाऊनच्या कालावधीत विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एप्रिल 2020मध्ये पॉवर पॉईंट प्रेसेंटेशन (पीपीटी) स्पर्धा आयोजित केली होती.
या स्पर्धेकरीता युनिफॉर्म सिव्हील कोड-निड ऑफ अवर, वुमन एमपॉवरमेंट-लॉ अलोन कॅनॉट, क्लीन एनव्हारोनमेंट-ए ड्रीम आणि ईट हेल्दी स्टे हेल्दी असे विषय देण्यात आले होते आणि सहभागी विद्यार्थ्यानी त्यांनी बनविलेले प्रेसेंटेशन महाविद्यालयाच्या ईमेलवर पाठविले आणि विविध निकषांनुसार महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शितला गावंड यांनी गुणांकन केले आणि 25 मे 2020 रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
देण्यात आलेल्या गुणांनुसार प्रथम क्रमांक-दीप्ती पाटील (3 वर्ष अभ्यासक्रम तिसरे वर्ष), व्दितीय क्रमांक अब्दुल लोखंडवाला, (3 वर्ष अभ्यासक्रम पाहीले वर्ष) आणि तृतीय क्रमांक सुप्रिया म्हात्रे (3 वर्ष अभ्यासक्रम पहीले वर्ष) यांची निवड करण्यात आली. कविता सिंग (5 वर्ष अभ्यासक्रम – तीसरे वर्ष) आणि रीमा गिडवानी (3 वर्ष अभ्यासक्रम दुसरे वर्ष) यांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रकासाठी निवडण्यात आले. या अभिनव उपक्रमाबद्दल संस्थेचे आणि महाविद्यालयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.