Breaking News

श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ कोरोना संकटकाळातील अतुलनीय कार्याबद्दल सन्मानित

पनवेल :  सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या आणि सेवाभावी कार्यात अग्रगण्य असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाने कोरोना वैश्विक महामारीच्या संकटकाळात शहरी व ग्रामीण भागातील तळागाळात मदतीचा हात देऊन लाखो नागरिकांना संरक्षित केले आहे. त्याबद्दल पनवेल महापालिकेच्या वतीने कृतज्ञता सन्मान पुरस्कार देऊन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचा आज सोहळ्यात गौरव करण्यात आला. 

           भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित स्पर्धा, टाकाऊ पासून टिकाऊ स्पर्धा आणि स्वच्छ भारत अभियान २०२२, तसेच स्वच्छता दूत गौरव समारंभ पनवेल महानगरपालिकेच्या वतीने शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात सोमवारी (दि. १६) पार पडला. आयुक्त गणेश देशमुख यांच्या हस्ते या सन्मानाचा स्वीकार मंडळाचे सचिव व सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केला.  सन्मानचिन्ह आणि कृतज्ञता सन्मान प्रमाणपत्र असे या सन्मानाचे स्वरूप आहे.
       या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर सीता पाटील, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, सभागृहनेते परेश ठाकूर, विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, यांच्यासह नगरसेवक, नगरसेविका, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
      कोरोना महामारीमुळे संपूर्ण जगावर मोठे संकट कोसळले. नोकरी धंदा व्यवसायावर संक्रात आली. या महामारीने जीव वाचवताना सर्वसामान्यांना पोटाच्या खळगीचा प्रश्न निर्माण झाला. अशा या भूतो न भविष्यतो संकटकालीन परिस्थितीत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सचिव परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली लाखो जणांना मदतीचा हात दिला. श्री.रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळाच्या माध्यमातून एक लाखाहून अधिक अन्नधान्याचे किट, कम्युनिटी किचनच्या माध्यमातून ०१ लाख ५० हजार व्यक्तींना अन्नछत्र, गावाला जाण्यासाठी मदत, रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिरांचे आयोजन, स्वछता मोहिम, आर्थिक मदत, याखेरीज ०१ लाख अर्सेनिक अल्बम गोळ्या, सॅनिटायझर, ०१ लाख १० हजार मास्कचे वाटप, कोरोना काळातील गणपती सण गोड करण्यासाठी ६० हजार जणांना प्रसादासाठी अन्नधान्य, अशी हरएक आवश्यक मदत करून कोरोना काळात नागरिकांना मोठा दिलासा देण्याचे काम झाले आहे. मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, सचिव परेश ठाकूर आणि सहकाऱ्यांनी कोरोना महामारीची कोणतीही तमा न बाळगता स्वतः जाऊन मदत केली, अन्नछत्राच्या माध्यमातून भुकेल्याला पोट भरून स्वतः जेवू घातले. कोरोनाला घाबरून न जाता गरजूंना त्यांच्या दारापर्यंत मदत पोहोचविण्याचे त्यांनी केले. 
         लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने देताना आपला-परका भेद केला जात नाही. गरजवंतांना प्रथम मदत करण्याचा दृष्टिकोन ठेवून हे मंडळ काम करीत असतो. ‘ एक तीळ सात जणांनी वाटून खावा!’ ही आपली संस्कृती, आणि त्या अनुषंगाने परिस्थितीने गांजलेल्या गरीब गरजूंना सर्व प्रकारची मदत देण्याचे काम महापूराप्रमाणे यावेळी कोरोना काळातही केले गेले. एवढेच नाही तर गावागावात, शहरोशहरी सर्व सुखरूप आहेत कि नाही याची विचारणाही यावेळी करण्यात आली. अन्नधान्य असो किंवा मेडिकल साहित्याची मदत किंवा विचारपूस हे कार्य खऱ्या अर्थाने माणुसकीचे दर्शन घडविणारे होते. म्हणूनच श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाला अतुलनीय कार्याबद्दल शासन आणि विविध संस्थेने सन्मानित केले आहे. त्याचबरोबर आज पनवेल महापालिकेच्यावतीने कृतज्ञता सन्मान करण्यात आला असून त्या निमिताने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 
           यावेळी देण्यात आलेल्या सन्मानपत्रात म्हंटले आहे कि, आपल्या संस्थेच्या वतीने कोविड १९ महामारीच्या संकटामध्ये पनवेल ग्रामीण व शहरी भागामध्ये सर्व नागरिकांना धान्य वाटप करून आपल्या सामाजिक संस्थेने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे. संकटामध्ये सापडलेल्या नागरिकांना आधार देण्याकरिता आपल्या संस्थेने केलेले कार्य निश्चितच अनमोल आहे. आपल्या संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल पनवेल महानगरपालिका सदैव आपली आभारी आहे. आपण दिलेले योगदान व सेवाकार्य आम्हाला प्रेरणादायक आहे.  

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply