
लोकांना धीर आणि आधार दोन्ही देण्याची गरज असताना हे तीन चाकी सरकार उलट त्यांना अधिकच गोंधळवून टाकते आहे. मार्चअखेरीपासून कामधंदा बाजूला ठेवून घरी बसलेली जनता आता अधिक काळ तग धरू शकणार नाही. गरीबच काय, कित्येक व्यावसायिकांनाही कोरोना-काळात आपला पूर्वीचा धंदा चालू शकणार नसेल तर पोटापाण्यासाठी अन्य पर्याय चोखाळायलाच हवेत असे वाटू लागले आहे. असे असताना पुन्हा लॉकडाऊनचे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य निश्चितच सार्यांना हबकवणारे आहे.
मार्च महिन्यात अकस्मात अवतरलेल्या कोरोना संकटाने सर्वसामान्यांना पार गोंधळात टाकले. सुशिक्षित आणि स्मार्ट फोन धारकांवर चहुबाजूंनी कोरोनासंबंधी माहितीचा मारा झाला. अजुनही होतो आहे. पण लॉकडाऊनमुळे पोटापाण्याची भ्रांत होऊन बसलेल्या कष्टकरी जनतेकरिता मात्र डेटा ही कमालीची न परवडणारी चैन होऊन बसली आहे. कोरोना विषाणू व त्याचा फैलाव ही नेमकी काय भानगड आहे हे कसेबसे थोडेथोडके कळलेल्या बहुतांश सर्वसामान्यांसाठी सतत हँडवॉशने हात धुणे, निरनिराळ्या प्रकारचे घुसमट न करणारे मास्क खरीदणे, भाज्या व अन्य सामग्री धुवून घेणे, बाहेर पडल्यास परतल्यावर लगेच गरम पाण्याने आंघोळ करणे हे सारेच न परवडणारे! दोन वेळा पोटाची खळगी भरेल का याचीच जिथे मोठी चिंता वाटू लागलेली, तिथे महिनोन् महिने विशेष दक्षतेचे हे चोचले गोरगरिबांना कुठून परवडायला? त्यामुळेच सरकार कधी एकदा लॉकडाऊन उठवते आणि आपल्या रोजीरोटीचा मार्ग मोकळा होता असे बहुसंख्य जनतेला झाले तर नवल ते काय? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय जनतेची ही निकड जाणूनच ‘जान भी और जहाँन भी’ अशी आपली आधीची घोषणा बदलली होती. कोरोनाने नाही तर अन्नपाण्याविना मरू, अशीच तगमग लॉकडाऊनच्या काळात कामाविना रखडलेल्या कित्येकांनी व्यक्त केली होती. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर सरकारने ‘मिशन बिगिन अगेन’ची घोषणा दिल्यावर, इंग्रजीतली घोषणा कदाचित अनेकांना कळली नसेल, पण आता हळूहळू सारे काही सुरू होईल ही दिलासादायी खबर मात्र त्यांच्यापर्यंत पोहोचलीच. परंतु त्यांच्या मनाला आलेली उभारी टिकवणे काही या सरकारला जमेल असे दिसत नाही. अनलॉकचे दोन-चार दिवस झाले न झाले तोच मुख्यमंत्री ठाकरे यांनी, शिथिलता जीवघेणी ठरते आहे असे दिसल्यास पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असा सूर लावला. सरकारच्या याच गोंधळ निर्माण करणार्या पवित्र्यावर शुक्रवारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकी टीका केली आहे. ही वेळ सरकारने दृढनिश्चय दाखवण्याची आहे. लोकांना जगवायचे असेल तर अर्थव्यवस्थेची विस्कटलेली घडी पुन्हा व्यवस्थित करावीच लागेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रातली कोरोना संदर्भातली परिस्थिती सुरूवातीपासून सातत्याने बिकटच आहे. गेल्या 24 तासांत राज्यात साडेतीन हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. लवकरच राज्यातील एकूण रुग्णांची संख्या एक लाखाचा टप्पा पार करील. कोरोना बळींची संख्याही साडेतीन हजारांच्या पुढे गेली आहे. जिथे मंत्रिमंडळातील तीन-तीन मंत्र्यांना कोरोनाची बाधा होते, तिथे सर्वसामान्यांना आपण काय सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळायला सांगणार? या अभूतपूर्व संकट काळात जनतेने या सरकारकडे कोणत्या गोष्टींच्या आधारे आशेने पाहायचे हा प्रश्नच आहे.