मुंबई : प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (दि. 9) महाराष्ट्राचा 2023-24 या वर्षाकरिता अर्थसंकल्प सादर केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा आणि अर्थमंत्री म्हणून फडणवीस यांनी मांडलेला हा पहिलाच अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात सरकारने सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
नमो शेतकरी महासन्मान योजना
केंद्रातील पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेंतर्गत वर्षाला शेतकर्यांच्या खात्यावर केंद्राच्या सहा हजार रुपयांसह महाराष्ट्राचे सहा हजार जमा होतील. म्हणजेच वर्षाला शेतकर्यांना 12 हजार रुपये मिळणार आहेत.
लेक लाडकी योजना
अर्थसंकल्पात महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली. यामध्ये लेक लाडकी ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली. राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर पाच हजार रुपये जमा केले जातील. त्यानंतर चौथीत असताना चार हजार, सहावीत असताना सहा हजार आणि मुलगी अकरावीत गेल्यानंतर तिच्या खात्यात आठ हजार रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलीचे वय 18 झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख मिळणार आहेत. सरकारने महिलांना सरसकट एसटी प्रवासात 50 टक्क्यांची सवलत दिली आहे.
नवीन महामंडळांची स्थापना
राज्यात काही नवीन महामंडळांची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये असंघटित कामगारांसाठी महाराष्ट्र राज्य असंघटित कामगार कल्याण मंडळ, लिंगायत तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी जगदज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ, गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ, रामोशी समाजासाठी राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, वडार समाजासाठी पैलवान कै. मारूती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ यांचा समावेश आहे. ही महामंडळे महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळांतर्गत असणार असून त्यांना प्रत्येकी 50 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार आहे.
आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविकांच्या मानधनात भरीव वाढ
* आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500वरून 5000 रुपये
* गट प्रवर्तकांचे मानधन 4700वरून 6200 रुपये
* अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325वरून 10 हजार रुपये
* मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975वरून 7200 रुपये
* अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425वरून 5500 रुपये
* अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका, मदतनीसांची 20 हजार पदे भरणार
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमध्ये मोठी वाढ, विद्यार्थ्यांना गणवेशही मिळणार मोफत
* पाचवी ते सातवी : 1000 वरून 5000 रुपये
* आठ ते दहावी : 1500वरून 7500 रुपये
* स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत
सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार
शिक्षणसेवकांना भरघोस मानधन (सरासरी 10 हजार रुपयांची वाढ)
* प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवक : 6000वरून 16 हजार रुपये
* माध्यमिक शिक्षणसेवक : 8000वरून 18,000 रूपये
* उच्चमा ध्यमिक शिक्षणसेवक : 9000वरून 20,000 रुपये
* पीएमश्री शाळा : 816 शाळा/5 वर्षांत 1534 कोटी रुपये