पनवेल : वार्ताहर – रायगडसह कोकणात झालेल्या निसर्ग वादळामुळे नागरिकांच्या घराचे पत्रे उडून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचबरोबर अनेक घराच्या भिंती पडून जिवीतहानी झाली नसली तरी आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालेले आहे. असे असताना रायगड जिल्ह्यातील व्यापारी पत्रे, स्क्रु, बांधकाम साहित्य चढ्या भावाने विक्री करून नागरिकांची लुट करीत आहेत, अशा व्यापार्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना वेळीच आवर घातला नाही तर नागरिकांना मरणापेक्षाही मरण होण्याचा संभव निर्माण झाला आहे.
निसर्ग वादळामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग विशेषतः कोकणात मोठा फटका बसला असून त्यामध्ये रायगड वासियांना सर्वात मोठा फटका बसला आहे. तळा, माणगाव, रोेहा, म्हसळा, श्रीवर्धन या समुद्र लगतच्या भागाला आणि डोंगराळ भागामधील असलेल्या घरांना व छोट्या व्यापार्यांना याचा मोठा फटका बसला असून त्यांचे उदरनिर्वाहाचे साधन तर गेलेच आहे त्याचबरोबर घराचे नुकसान झाल्यामुळे ते आर्थिक विंवचनेत सापडलेले असताना शासनाने 100 कोटीची तात्पुरती मदत जाहीर केलेली आहे. पण ती अद्याप नागरिकांच्या हातात पडलेली नाही, अशा परिस्थितीत त्रेधातिरपिट उडालेल्या कोकणवासिय आपले घर पुन्हा उभे रहावे त्याचबरोबर आपला व्यवसाय पुन्हा उभा रहावा म्हणून पावसाळा सुरू झाल्यामुळे आपल्याकडे, आपल्या नातेवाइकांकडून मिळेल ती आर्थिक मदत घेेवून आपले घर उभे करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
संकटात सापडलेल्या नागरिकांचा फायदा घेवून तळा, इंदापूर, माणगाव, म्हसळा, गोरेगाव, श्रीवर्धन येथील व्यापारी नागरिकांची लूट करीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी रायगड यांनी अशा लुट केलेल्या व लुट करीत असलेल्या व्यापार्यांवर निर्बंध घालून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रायगडमधील सामान्य नागरिकांमधून केली जात आहे.