पनवेल : वार्ताहर – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कामोठे वसाहतीमध्ये वाढला आहे. लॉकडाऊन उठविल्यामुळे नागरिकांनी रस्त्यावर खरेदीसाठी गर्दी न करता प्रत्येकाने सोशल डिस्टन्सिंग पाळून वागल्यास कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कामोठे वसाहतीमध्ये होणार नाही या दृष्टीने सर्वांनी नियम पाळावे व कामोठ्यातून कोरोनाला पळवून लावावे असे आवाहन कामोठे वसाहतीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी आवाहन केले आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी नुकताच कामोठे पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी संपूर्ण कामोठे पोलीस ठाण्याची पाहणी केली. पोलीस बांधवांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी विविध सकारात्मक बदल पोलीस ठाण्यात करून घेतले. ठिकठिकाणी सॅनिटायझर, मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंगचा वापर, तक्रारदार पोलीस ठाण्यात येताना त्याची बॉडी टेंम्प्रेचर तपासणी करणे आदी बदल त्यांनी केले असून त्यामुळे प्रत्येकाला पोलीस ठाण्यात प्रवेश करताना नियमाचे पालन करूनच आत जावे लागणार आहे व आपली तक्रार नोंदवावी लागणार आहे.
पोलीस ठाण्यातील अडगळ त्यांनी काढून टाकली आहे. त्याचप्रमाणे अधिकारी व कर्मचार्यांसाठी विशेष उपाय योजना सुद्धा सुचविल्या आहेत. तशाच प्रकारे त्यांनी काळजी कामोठे वसाहतीमधील नागरिकांची घ्यायला सुरूवात केली. त्या अनुषंगाने वसाहतीमधील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे, मास्कचा वापर करावा, सॅनिटायझर वापरावे तसेच जास्तीत जास्त घरात रहावे व कामकाज करावे, असे आवाहन सुद्धा वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी केले आहे.