Breaking News

पोलिसांच्या मागे कोरोना

दोन अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाग्रस्त; सात रुग्णांची भर

कर्जत ः बातमीदार

कर्जत तालुक्याच्या सर्व भागांत कोरोनाचा संसर्ग पोहचला असून पोलिसांच्या मागे कोरोना लागल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोठडीमधील आरोपीमुळे कर्जत पोलीस ठाण्यातील चार पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस अधिकारी, तसेच एक महसूल अधिकारी कोरोनाग्रस्त आहे. आता नेरळ पोलीस ठाण्याच्या कोठडीत असलेल्या आरोपीमुळे तेथील एका अधिकार्‍याला कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, कर्जत तालुक्यात आणखी सात नवीन रुग्ण आढळले असून तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 58वर पोहचली आहे.

कर्जत पोलीस ठाण्यातील आरोपी कर्जत तहसील कार्यालयाच्या कोठडीत असताना कोरोना पॉझिटिव्ह झाला. त्याच्या संपर्कात आल्याने कर्जत पोलीस ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी आणि एक पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत, तर एका पोलिसाची पत्नीदेखील कोरोना पॉझिटिव्ह झाली असून आता त्यात कर्जत पोलीस ठाण्यातील आणखी एका पोलीस कर्मचार्‍याची वाढ झाली आहे. कर्जत पोलीस ठाण्यात बिनतारी संदेश विभागात काम करणार्‍या 36 वर्षीय पोलीस कर्मचार्‍याचा कोरोना अहवाल 19 जून रोजी पॉझिटिव्ह आला. त्याच वेळी नेरळ पोलीस ठाण्याच्या कोठडीतील आरोपीला कोरोना झाला. त्याच्या संपर्कात आल्याने नेरळ पोलीस ठाण्यातील एक 56 वर्षीय पोलीस उपनिरीक्षकाला कोरोनाची लागण झाली. त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पोलीस उपनिरीक्षकाच्या संपर्कात आलेल्या अनेक पोलिसांना क्वारंटाइन करण्यात आले. कर्जत तहसील कार्यालयात यापूर्वी पुरवठा अधिकारी पदावर काम करणारे 52 वर्षीय महसूल विभागातील नायब तहसीलदारांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या पेण तहसील कार्यालयात सेवा बजावत असलेले हे महसूल अधिकारी कर्जत शहरातील मुद्रे भागात राहतात.

दरम्यान, नेरळ गावातील खांडा भागातील कोरोना पॉझिटिव्ह 45 वर्षीय डॉक्टरांची 32 वर्षीय पत्नी आणि सहा वर्षांच्या मुलीचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ममदापूर गावातील 65 वर्षीय महिलेस कोरोना झाला आहे. ही महिला अन्य आजारांनीही त्रस्त होती. कर्जत तालुक्यात नेरळ गावात सध्या टेपआळी, मोहाचीवाडी आणि खांडा भागात कोरोनाचे अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, तर ममदापूर ग्रामपंचायतीमध्ये ममदापूर गावात एक आणि या ग्रामपंचायतीमधील गोकुळधाम इमारतीत तीन रुग्ण आहेत. एक रुग्ण भडवळ गावात आणि एक झेंडेवाडीत आहे.कर्जत शहरात दोन पोलीस आणि एक महिला असे तीन रुग्ण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत. कर्जत तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पन्नाशी पार करून 57वर पोहचली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …

Leave a Reply