कर्जत : बातमीदार
शिवजयंतीचे औचित्यसाधून नेरळ येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या शिवाजी महाराज चौकात शनिवारी महाराजांची नवीन मूर्ती प्रतिस्थापित करण्यात आली. यावेळी संपूर्ण शहरात काढण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीच्या निमित्ताने नेरळ भगवेमय झाले होते.
सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने 1994 मध्ये प्रथम नेरळ गावात असलेल्या शिवाजी महाराज चौकाचा चौथरा उभा राहिला, तर त्यावर 2008 मध्ये शिवाजी महाराज यांची प्रतिमा उभी करण्यात आली. 2014 मध्ये त्या ठिकाणी शिवाजी महाराजांचा सिंहासनवर बसलेला पुतळा उभारण्यात आला होता. मात्र रस्ता रुंदीकरणात नूतनीकरण करण्यात आलेल्या या चौकामध्ये शनिवारी विधीवत पूजन करून शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करण्यात आला. नेरळ ग्रामपंचायत आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने हे काम पूर्ण करण्यात आले.
जि.प.चे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, कर्जत पं.स. सदस्या सुजाता मनवे, जि.प. चे माजी सदस्य सावळाराम जाधव, नेरळच्या सरपंच जानवी साळुंखे, माजी सरपंच सुवर्णा नाईक,भाजपचे प्रज्ञा प्रकोष्ट कोकण संयोजक नितीन कांदळगावकर, उत्सव समितीचे अध्यक्ष संतोष शेळके, उपाध्यक्ष राजेंद्र वाघेश्वर, प्रमोद डबरे, सचिव विशाल साळुंखे, कौतुभ टिल्लू, रवी खांबल, कुणाल मनवे, प्रवीण कोळंबे, उदय मोडक, सेनेचे उपतालुका प्रमुख अंकुश दाभणे, शहर प्रमुख रोहिदास मोरे, गजानन जाधव, सुरेश गोमारे, प्रभाकर देशमुख, किसन शिंदे, हेमंत क्षीरसागर, जयेद नजे, ताहीर जळगावकर यांच्यासह उत्सव समितीचे माजी पदाधिकारी, सदस्य आणि शिवप्रेमी नागरिक यावेळी उपस्थित होते. सज्जनगड येथून शिवज्योत आणणार्या तरुणांचे नेतृत्व करणारे श्याम कडव आणि प्रथमेश कर्णिक यांच्यासह अन्य तरुणांचे उत्सव समितीच्या वतीने यावेळी कौतुक करण्यात आले. यानंतर उत्सव समितीच्या वतीने शहरातील हुतात्मा चौकातून मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती.