Breaking News

नेरळमधील सोसायटीचा बळीराजाला हात

साडेतीन कोटींचे कर्ज शेतकरी सभासदांना बिनव्याजी वाटणार

कर्जत : बातमीदार
रायगड जिल्ह्यातील शेतकरी कोरोनाच्या संकटामुळे मेटाकुटीला आला आहे. अशा वेळी बळीराजाला आधार देण्यासाठी कर्जत तालुक्यातील नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटी पुढे सरसावली आहे. सोसायटीने आपल्या 450 शेतकरी सभासदांसाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये पीक कर्जासाठी उपलब्ध करून दिले असून, हे सर्व कर्ज बिनव्याजी असणार आहे.
कोरोनामुळे लागू केलेले लॉकडाऊन आणि त्यानंतर निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत शेतकर्‍यांकडे शेतीसाठी आवश्यक असलेले बी-बियाणे, खते, अवजारे यांच्यासाठी पैसे नाहीत. अशावेळी नेरळ विविध विकास कार्यकारी सोसायटीने ‘नाबार्ड’ची परवानगी घेऊन पीक कर्ज आपल्या सभासद शेतकर्‍यांसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. नेरळमध्ये या सोसायटीचा प्रशस्त हॉल असून, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि भात खरेदी केंद्रसुद्धा ही सोसायटी चालवते. त्यातून मिळणारे उत्पन्न सभासद शेतकर्‍यांना मदत म्हणून वितरित केले जाते. या वर्षी बळीराजावर आलेले संकट पैशाची आवक नसल्याने दिसून येत आहे. त्यामुळे या सोसायटीने सभासद शेतकर्‍यांसाठी कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.
सभासद शेतकर्‍याला भाताचे बियाणे, खते आणि अवजारे उपलब्ध करून देण्यासाठी 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्यात येत आहे. पीक कर्ज योजना जाहीर झाल्यानंतर तत्काळ 175 सभासद शेतकर्‍यांनी कर्ज उचलले आहे. मे 2020पासून ही योजना राबवली जात असून, कर्जाची रक्कम मार्च 2021पर्यंत भरण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. या कर्जावर कोणत्याही प्रकारचे व्याज आकारले जाणार नाही, मात्र मार्चपर्यंत कर्जाची रक्कम न भरणार्‍या शेतकर्‍यांना नंतर व्याज आकारले जाऊ शकते, असे सोसायटीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

Check Also

शिधापत्रिकाधारकांच्या प्रश्नावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी अधिवेशनात शासनाचे लक्ष केले केंद्रित

पनवेल, मुंबई : रामप्रहर वृत्तराज्यातील शिधापत्रिकाधारकांच्या अडचणींवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शासनाचे …

Leave a Reply