पनवेल : वार्ताहर
भारत विकास परिषद पनवेल व हिंदू नववर्ष स्वागत समिती दहिसर, आनंदवन मित्र मंडळ मुंबई, विविसू डेहरा यांच्यातर्फे बॉर्डरवरील सैनिकांसाठी दिवाळी फराळ पाठविण्यात येणार आहे. चकली, चिवडा, लाडू, शेव भरलेले पाच हजार बॉक्स सैनिकांना पोहचविण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. सद्य स्थितीत दोन हजार बॉक्स तयार झाले आहेत. यासाठी भारत विकास परिषदेचे सदस्य मेहनत घेत आहेत.
संस्थेचे हे दूसरे वर्ष असून सैनिकांना दिवाळीसाठी फराळ पाठवण्याचे शिवधनुष्य भारत विकास परिषदने यशस्वीरित्या पेलले आहे. या उपक्रमात संस्थेचे अध्यक्ष गिरीश समुद्र, सचिव नितीन कानिटकर यांसह अन्य पदाधिकार्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यापुढेही असेच उपक्रम राबवण्याचा संस्थेचा मानस असल्याचे सुबोध भिडे यांनी सांगितले. जम्मू काश्मीर, मेघालय, मणिपूर, भुज, लेह येथील सैनिकाना दिवाळी फराळ पाठविण्यात येणार आहे.
घरगुती बनविलेला दिवाळी फराळ दिवाळीच्या आधी सैनिकापर्यंत पोहचवणार असल्याचे ज्योती कानिटकर यानी सांगितले. भारत विकास परिषद पनवेल शाखेत एकूण 128 सदस्य आहेत. लोकसहभागातून दिवाळी फराळाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. मागील वर्षी 371 नागरिकांनी देणगी दिली होती. आत्तापर्यंत 275 जणांनी दिवाळी फराळ कार्यक्रमाला हातभार लावलेला आहे. या उपक्रमात ज्यांना कोणाला मदत करायची आहे. त्यांनी ज्योती कानिटकर 8424048253 यांच्याशी संपर्क साधावा.