Breaking News

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत पोहचवावी

संजयआप्पा ढवळे यांची मागणी

माणगाव ः प्रतिनिधी

कोकणात निसर्ग चक्रीवादळ होऊन 22 दिवस झाले तरी अद्याप वादळातील नुकसानग्रस्तांपर्यंत राज्य सरकारची मदत पोहचलेली नाही. त्यामुळे अनेक नुकसानग्रस्त चिंतेत असून राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन गोरगरिबांना तत्काळ शासकीय मदत मिळण्यासाठी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी केली आहे.

संजयआप्पा ढवळे यांनी सांगितले की, कोकणाला निसर्ग चक्रीवादळाचा प्रचंड तडाखा बसला आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव, श्रीवर्धन, म्हसळा, तळा, मुरूड, अलिबाग, पेण, पोलादपूर तालुक्यांनाही मोठा फटका बसला आहे. माणगावमधील अनेक गावे अजूनही वीजप्रवाह खंडित झाल्याने अंधारात आहेत.

अनेकांच्या घरांवरील कौले, पत्रे उडाल्याने त्यांचे प्रचंड हाल झाले आहेत. श्रीमंतांनी आपले छत काही दिवसांत उभे केले, मात्र गरिबांची घरे तशीच आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेले. त्यातच निसर्ग चक्रीवादळामुळे जोरदार तडाखा दिल्याने सामान्य नागरिकांचे पुरते हाल झाले. कोरोनाच्या संकटामुळे सर्वसामान्यांच्या हाती पैसा राहिला नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाचे संकट तसेच चक्रीवादळामुळे गरिबांचे जीणे मुश्कील झाले आहे. सध्या मान्सूनचा हंगाम असल्याने घरात पावसाचे पाणी शिरण्याची भीती अनेकांना वाटत आहे. त्यातून आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने या सर्व बाबींचा विचार करून गरिबांना तत्काळ आर्थिक मदत करून धीर द्यावा, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष संजयआप्पा ढवळे यांनी केली आहे.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply