Breaking News

राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल 99.63 टक्के; कोकण विभाग अव्वल

मुंबई ः प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल मंगळवारी (दि. 3) जाहीर करण्यात आला. राज्याचा यंदाचा निकाल 99.63 टक्के लागला आहे. राज्यात कोकण विभाग (99.81 टक्के) पुन्हा अव्वल ठरला असून औरंगाबाद (99.34 टक्के) विभागाचा निकाल सर्वांत कमी लागला आहे. कोरोनामुळे ही परीक्षा होऊ शकली नव्हती. कोरोना प्रादूर्भावामुळे राज्य शासनाने बारावीची परीक्षा रद्द करून अंतर्गत मूल्यमापनाद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेतला होता. 31 जुलैपर्यंत निकाल जाहीर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे राज्य मंडळाला पालन करता आले नाही. बारावीच्या निकालावर विविध पदवी अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अवलंबून असल्याने राज्य मंडळ निकाल कधी जाहीर करणार याकडे विद्यार्थी पालकांचे लक्ष लागले होते. अखेर मंगळवारी हा निकाल जाहीर झाला. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळातून विज्ञान, कला, वाणिज्य आणि उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एचएससी व्होकेशनल) या शाखांतील एकूण 13 लाख 19 हजार 754 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 13 लाख 14 हजार 965 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 99.63 टक्के आहे. राज्यातील 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.

विभागनिहाय निकाल

कोकण 99.81%, मुंबई 99.79%, पुणे 99.75%, कोल्हापूर 99.67%, लातूर 99.65%, नागपूर 99.62%, नाशिक 99.61%, अमरावती 99.37%, औरंगाबाद 99.34%

यंदाही मुलींची बाजी 

यंदाही निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळांतून विद्यार्थिनींचा निकाल 99.73 टक्के, तर विद्यार्थ्यांचा निकाल 99.54 टक्के लागला आहे. विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.19 टक्के अधिक आहे.

शाखानिहाय निकाल

विज्ञान शाखा ः 99.45 टक्के, कला शाखा ः 99.83 टक्के, वाणिज्य शाखा ः 99.91 टक्के, उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम (एचएससी व्होकेशनल) ः 98.80 टक्के.

तक्रारींच्या निराकरणासाठी अधिकार्‍यांची नियुक्ती

अंतर्गत मूल्यमापन पद्धतीद्वारे जाहीर केलेल्या निकालाबाबत विद्यार्थ्यांच्या काही तक्रारी असल्यास त्यांच्या निराकरणासाठी मंडळाच्या स्तरावर व्यवस्था निर्माण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्या अनुषंगाने राज्य मंडळाने विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विभागीय मंडळाच्या स्तरावर अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांना तक्रार नोंदवण्यासाठी टपाल, ई-मेल किंवा व्यक्तिशः तक्रार नोंदवता येईल. त्यासाठीच्या अर्जाचा नमुना, तक्रारींचे निराकरण करण्यासाठीच्या अधिकार्‍यांची नावे, संपर्क क्रमांक, ई-मेल पत्ता आदी माहिती राज्य मंडळाने संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. तक्रारीचा अर्ज केल्यानंतर 10 दिवसांत त्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

सीबीएसई दहावीचा निकाल 99.4 टक्के

नवी दिल्ली ः केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाचा (सीबीएसई) दहावीचा निकालही मंगळवारी (दि. 3) जाहीर झाला असून 99.4 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. पहिल्यांदाच बोर्डाने परीक्षेशिवाय दहावीचा निकाल जाहीर केला असून निकालाची टक्केवारी वाढली आहे. तरीदेखील विद्यार्थी निकालाबाबत असमाधानी असेल, तर त्याच्याकडे ऑफलाइन परीक्षा देण्याचा पर्याय आहे. म्हणजेच पुन्हा परीक्षा देता येणार असून ती 16 ऑगस्ट ते 15 सप्टेंबरदरम्यान होणार आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply