माणगाव : प्रतिनिधी
निसर्ग वादळाने 87 पेक्षा अधिक गावांना या वादळाचा फटका बसला. घरे, बागा, इमारती व सार्वजनिक इमारतींचे या वादळाने मोठे नुकसान केले आहे.
ताशी 120 किमी वेगाने समुद्र किनार्यावरून जिल्हयातील मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, तळा, अलिबाग, सुधागड, महाड, पोलादपूरसह उर्वरित तालुक्यात घुसलेल्या वादळाने घरे, बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या बरोबरच वादळग्रस्त भागातील सार्वजनिक सभागृह व शैक्षणिक संकुले, शाळांच्या इमारती यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. शाळांचे शेड्स कौले ढापे उडाले असून भिंतींना तडे गेले असून काही शाळांच्या भिंती कोसळल्या आहेत.
जून महिन्यात सुरू होणार्या शाळा कोरोना महामारीमुळे बंद आहेत. मात्र नुकसान झालेल्या शाळांच्या मदतीला ग्रामस्थ, समाजसेवी संघटना व देणगीदाते सरसावले असून नुकसानग्रस्त शाळांची साफसफाई, डागडूजी व नवीन बांधकाम करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न सुरू केले आहेत.