आरोग्य प्रहर
पंचेंद्रियांपैकी एक असलेल्या डोळ्यांचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. वयानुरूप इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांची क्षमताही कमी होते. काही वेळा डोळ्यांवर ताण येऊन डोळ्यांचा एखादा आजार होऊनही दृष्टी अधू होऊ शकते. त्याचप्रमाणे संसर्गजन्य आजार किंवा जीवनशैलीजन्य आजार ज्यांचा डोळ्यांशी थेट संबंध नाही त्यांच्यामुळेही डोळ्यांच्या क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असते. मधुमेह, रक्तदाब व अगदी डेंग्यूसारख्या आजारानेही डोळ्यांवर परिणाम होतो. त्यामुळे हे आजार असलेल्यांनी डोळ्यांच्या आरोग्याबाबत जागरूक राहायला हवे.
मधुमेह : मधुमेह म्हणजे रक्तातील साखर अनियंत्रित वाढण्याचा आजार. रक्त हे शरीरात सर्वच अवयवांपर्यंत पोहचत असल्याने रक्तामध्ये वाढलेल्या साखरेचा परिणामही अक्षरश: प्रत्येक अवयवावर होतो. पायापासून डोळ्यांपर्यंत सर्व अवयव मधुमेहामध्ये बाधित होतात. मधुमेहामुळे डोळ्यातील दृष्टिपटलाला (रेटिना) त्रास संभवतो.
रक्तदाब : रक्तदाब वाढण्याचा परिणाम हादेखील मधुमेहासारखाच असतो. रक्तदाब वाढण्याचा परिणाम शरीराच्या सर्व अवयवांवर होतो. डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांमध्येही रक्ताचा अतिरिक्त दाब निर्माण होतो. परिणामी रक्तस्राव होतो. या रक्तदाबामुळे मेंदूमध्येही दाब वाढतो. याचा परिणाम अर्थातच डोळ्यांवर होतो. यात डोळे पांढरे होणे किंवा दृष्टीही जाऊ शकते.
संधिवात : संधिवातामुळे डोळ्यांमधील बाहुलीचा अल्सर होण्याची शक्यता असते, तर अनेकदा डोळ्यांचा पांढरा भाग लाल होतो. अशा वेळी पांढर्या भागाचे प्रत्यारोपण करण्याची आवश्यकता निर्माण होते. डोळ्यांच्या बाहुलीबरोबरच डोळ्यांच्या मागच्या पडद्यावरही संधिवाताचा परिणाम दिसून येतो.
डेंग्यू : डेंग्यू या आजाराचा संसर्ग झाल्यानंतर काही वेळा दृष्टी जाण्याचीही शक्यता असते. एडिस इजिप्ती हा डास चावल्यामुळे डेंग्यू होतो. या डासावाटे शरीरात शिरकाव केलेले विषाणू शरीरभर पोहचण्याचा प्रयत्न करतात. त्याच वेळी शरीरातील पेशी या विषाणूंचा सामना करतात. त्यामुळे काही वेळा त्या भागातील अवयवांनाही इजा होते. हे विषाणू डोळ्यांजवळील पेशींजवळ गेले तर डोळ्यांच्या पापण्यांपासून मागच्या पडद्यापर्यंत दाब येतो.