Breaking News

नागोठण्यात आढळले दोन कोरोनाबाधित रुग्ण

नागोठणे ः प्रतिनिधी

कोरोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या शहरातील एकाच कुटुंबातील तिघांचे स्वॅब तपासणीसाठी नेण्यात आले होते. यापैकी दोघांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे शहरात कोरोना संक्रमित रुग्णांची एकूण संख्या चारवर पोहचली आहे. या दोन व्यक्तींचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे अधिकृतपणे कळल्यावर सकाळी येथील ग्रामपंचायतीकडून बाधित व्यक्तींच्या घराचा परिसर व रस्ता पूर्णपणे बंद करून परिसरातील दुकानेसुद्धा बंद करण्यात आली आहेत. सकाळी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल, पो. नि. दादासाहेब घुटुकडे यांच्यासह उपसरपंच सुरेश जैन, ग्रामपंचायत सदस्य शैलेंद्र देशपांडे, अकलाख पानसरे, ज्ञानेश्वर साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयकुमार देशमुख, आरोग्य विभागाचे यशवंत कर्जेकर यांनी भेट देऊन पाहणी केली.

बोरी परिसर कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित

पेण ः प्रतिनिधी

पेण तालुक्यातील मौजे बोरी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. परिणामी कोरोनाबाधित रुग्ण राहत असलेला बोरी गावातील परिसर कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पुढील 28 दिवस कोरोना विषाणूबाधित क्षेत्र घोषित करण्यात आला आहे.

या परिसरात राहणार्‍या नागरिकांना घरातून बाहेर पडण्यास व अन्य ठिकाणी स्थलांतरित होण्यास तसेच बाहेरून येणार्‍या लोकांना या बाधित क्षेत्रात प्रवेश करण्यास जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी प्रतिबंध आदेश लागू केले आहेत.

आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 कलम 51 व तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951चे कलम 71, 139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी कळविले आहे.

रोह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव

एकाच दिवशी 15 पॉझिटिव्ह

रोहे ः प्रतिनिधी

रोहा तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असून शनिवारी (दि. 27) एकाच दिवशी 15 कोरोनाबाधित व्यक्ती आढळल्याची माहिती तहसीलदार कविता जाधव यांनी दिली. शहरासह ग्रामीण भागात एकाच दिवसात 15 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने रोहा तालुक्याची चिंता वाढून तालुक्याचे प्रशासन, आरोग्य विभाग व नगरपालिका यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. तालुक्याच्या ग्रामीण भागात कोरोनाबाधित व्यक्ती आढळत असताना रोहा अष्टमी शहराला कोरोनाचा विळखा बसण्यास सुरुवात झाली आहे.

एक व्यक्ती कोरोनावर मात करून घरी गेली आहे. त्यामुळे कोरोनावर मात करून बरे होणार्‍यांची संख्या 26 झाली आहे. शनिवारी सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्या आहेत.

रोहा अष्टमी शहरात सात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्याने रोहा शहरातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 13 झाली आहे, तर तालुक्यातील ग्रामीण भागात आठ कोरोना पॉझिटिव्ह व्यक्ती आढळल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांची संख्या 33 झाली आहे. शनिवारपर्यंत रोहा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात एकूण 46 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

माणगावात कोरोनाबाधितांची संख्या 21वर

माणगाव ः प्रतिनिधी

माणगावात निसर्ग चक्रीवादळानंतर कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तालुक्यातील लोकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. माणगाव नगरपंचायत हद्दीत सात, तर तालुक्यातील इंदापूर येथील एका रुग्णाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तालुक्यातील सुर्ले येथील रुग्णाचा महिनाभरापूर्वी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्यानंतर त्याचा दहनविधी माणगावात करण्यात आला होता. त्या रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अशा एकूण नऊ रुग्णांचा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त झाल्याची माहिती तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी दिली. नऊ कोरोना रुग्णांत दोन रुग्ण 11 व 13 वयोगटातील लहान मुलगा व मुलगी आहेत. नऊ नवीन रुग्णांपैकी एक मयत रुग्ण वगळता तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 21वर पोहचली आहे.

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यापासून माणगाव नगरपंचायत हद्द कोरोनाबाधित झाली. सरकारी कार्यालयाबरोबरच इतरत्र रुग्ण आढळण्यास सुरुवात झाल्याने सार्‍यांचीच चिंता वाढली आहे. माणगावात शुक्रवारी एकाच दिवशी सात रुग्णांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थांनी चांगलीच धास्ती घेतली आहे. माणगावनगरीत लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून सकाळच्या सत्रात गर्दी होताना दिसत आहे. ही गर्दी म्हणजे धोक्याची घंटा आहे. नागरिकांनी गर्दी करू नये, अशा सूचना शासन व प्रशासन जनतेला वेळोवेळी करीत आहे. माणगावकर नागरिकांनी कोरोनाचे वाढते संकट पाहता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार प्रियंका आयरे-कांबळे यांनी केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply