महाड ः प्रतिनिधी
निसर्ग चक्रीवादळादरम्यान राज्यात सुरू झालेला पाऊस केवळ सलग 10 दिवस पडला व त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. गेली काही दिवस दिवसभरात कुठेतरी एखादी पावसाची सर कोसळत आहे. त्यातच ढग दिसेनासे झाल्याने कडक ऊन पडत आहे. त्यामुळे शेतात पाणी नसल्याने शेतकर्यांची भातलावणी रखडली आहे.
गेली काही दिवस महाडसह संपूर्ण परिसरात कडक ऊन पडत आहे. त्यामुळे येथील तापमान किमान 36 अंश सेल्सिअसपर्यंत आल्याने उन्हाळ्याप्रमाणे झळा बसत आहेत. अचानक दडी मारलेल्या पावसाने वातावरण बदलले. कडक उन्हाने पुन्हा अंगाची लाही लाही होऊ लागली आहे. यामुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण झाल्या. गायब झालेल्या पावसाला येरे येरे पावसा म्हणण्याची वेळ आली असून, शेतकरीही चिंतेत सापडले आहेत. भाताची रोपे चांगलीच वाढली असून उन्हाचा रोपांवर परिणाम होऊ शकतो. ज्या ठिकाणी पाणी साचले त्या शेतकर्यांनी भातलावणी सुरू केली, मात्र बहुतांश ठिकाणी पाण्याअभावी भातलावणीची कामे
खोळंबली आहेत.
भातलावणीकरिता बहुतांश भागात आदिवासी मजुरांना बोलावतात, मात्र पावसाने दडी मारल्याने भातलावणीची कामे खोळंबली आहेत. त्यामुळे आदिवासींच्या हातालादेखील काम नसल्याने तेही चिंतेत पडले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे अनेक कामे ठप्प असल्याने आदिवासी रानावनात आणि मासे मारून आपली गुजराण करीत आहेत. भातलावणीसाठी कोकणात मुबलक पाणीसाठा आवश्यक आहे. चिखलीशिवाय लावणी केली जात नसल्याने दडी मारलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.