अलिबाग : प्रतिनिधी
अलिबाग नगर परिषदेतर्फे स्व. नमिता प्रशांत नाईक क्रीडासंकुल उभारण्यात येत आहे, परंतु महाराष्ट्र सरकारकडून निधी मिळत नसल्यामुळे या संकुलाचे काम रखडले आहे, अशी माहिती अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी दिली. स्व. नमिता प्रशांत नाईक क्रीडासंकुलाची माहिती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष प्रशांत नाईक बोलत होते. या पत्रकार परिषदेस उपनगराध्यक्षा अॅड. मानसी म्हात्रे, गटनेते प्रदीप नाईक व इतर नगरसेवक उपस्थित होते. स्व. नमिता प्रशांत नाईक क्रीडासंकुलाच्या उभारणीसाठी एकूण साडेपाच कोटी खर्च अपेक्षित असून आजवर 3.38 कोटीचा निधी आम्हाला प्राप्त झालेला आहे. त्यामुळे उर्वरित 2.20 कोटीच्या निधीकरिता आमचा शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे, असे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले. जिल्हा नगरोत्थानचे दोन कोटी तर नगर परिषदेचा स्वनिधी 1.38 कोटी असा एकूण 3.38 कोटीचा निधी या कामासाठी आजवर प्राप्त झालेला असून सर्व रक्कम क्रीडा संकुलाच्या कामकाजाकरिता खर्च करण्यात आली आहे. ज्यामधून क्रीडा संकुलामध्ये बॅडमिंटन कोर्ट, अत्याधुनिक स्विमिंग पूल, आधुनिक योगा सेंटर, जिमखाना, स्वतंत्र व्यायामशाळा याची उभारणी करण्यात आलेली आहे. स्विमिंग पूलचे 80 टक्के काम पूर्ण झालेले असून क्लोरीनेशन युनिटचे कामकाज बाकी आहे. राज्य शासनाकडून उर्वरित निधी मिळाला की हे काम पूर्ण केले जाईल, असे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी शेवटी सांगितले.