कर्जत : बातमीदार
हरवलेल्या व्यक्तीच्या जागी बनावट व्यक्तीचे कुलअखत्यार पत्र तयार करून नेरळ नजीकच्या धामोते येथील जमीन हडप करण्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी हरवलेल्या व्यक्तीच्या भावाने केलेल्या तक्रारीवरुन जमीन हडप केलेल्या पाच जणांच्या विरुद्ध नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुहू, मुंबई येथे राहणारे विल्यम बल्ताजार लोबो (वय 70) यांचा भाऊ सायमन बल्ताजार लोबो यांची धामोते (ता. कर्जत) येथे सर्व्हे न. 69 हिस्सा नं. 2 मध्ये 56 गुंठे जमीन होती. मात्र सायमन हे 5 जुलै 2008 पासून हरवले आहेत. त्याची माहिती मिळाल्यानंतर हालवली गावातील नितीन बोराडे त्याच्या मित्रासह ऑक्टोबर 2016 मध्ये विल्यम यांना भेटला. सोबत त्याने जमिनीचा एमओयु तयार करून आणला व त्यावर सही करण्यास सांगितले. विल्यम यांना संशय आल्याने त्यांनी सही केली नाही. त्यानंतर 12 ऑगष्ट रोजी नितीन हा पराग उर्फ सनी चव्हाण याला घेऊन घाटकोपरला आला आणि मी एक कोटी रुपये तुम्हाला देतो मला जमीन द्या, असे त्याने सूचित केले आणि एका कागदावर सही करण्यास सांगितले. विल्यम यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे कोणताही व्यवहार झाला नाही.
दरम्यान, संतोष बबन राऊत (रा. धामोते, ता. कर्जत) यांनी विल्यम भेटून काही कागदपत्रे दिली. त्यात विल्यम यांचा भाऊ सायमन हरवला असतानाही त्याच्या जागी बोगस व्यक्ती उभी करून बनावट कुलअखत्यारपत्र तयार करण्यात आले होते. व ती जमीन पराग तथा सनी तानाजी चव्हाण (वय 33, रा. कर्जत) व भानुदास जगन्नाथ बोराडे (वय 38, रा. हालीवली) यांच्या नावे कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदीखत तयार करून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर विल्यम लोबो यांनी 3 जानेवारी 2019 नेरळ पोलीस ठाण्यात बनावट कुलअखत्यारपत्राच्या आधारे जमीन हडप करुन फसवणूक करणार्या नितीन बोराडे, पराग तथा सनी तानाजी चव्हाण, भानुदास जगन्नाथ बोराडे, नितीन चिंतामण आबाळे आणि दीपक दत्तात्रेय शिंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.