पनवेल ः बातमीदार
कोरोना विषाणू संसर्ग चाचणीचा वेग पनवेलमध्ये वाढला आहे. गेल्या 31 दिवसांत 3320 रुग्णांच्या चाचण्या पालिकेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्ण शोधमोहीम वेगाने होत असल्याचे प्रशासनाने सांगितले. याआधी 66 दिवसांत पनवेलकरांच्या 2500 चाचण्या करण्यात आल्या आहेत. 22 मार्च ते 28 मेदरम्यान 2568 रुग्णांच्या चाचण्या पालिकेने केल्या होत्या. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आमदार प्रशांत ठाकूर आणि महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिका आयुक्तांकडे कडक पावले उचलण्याची मागणी केली होती.
मेट्रो पोलीस प्रयोगशाळा, सिटी बँक आणि सिप्ला फाऊंडेशन यांच्या सहकार्यातून साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी पालिकेला उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी चाचण्या गतिमान होण्यासाठी भर दिला आहे. नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे नसताना कोरोना चाचणीत बाधा झाल्याचे वेळीच समजल्याने रुग्णांना वेळीच उपचार घेता आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले. याआधी दिवसाला सरासरी 39 जणांच्या चाचण्या करून त्यांचे अहवाल दिले जात होते. अहवाल प्राप्त होण्यासाठी विलंब लागत होता, मात्र पालिकेला खासगी प्रयोगशाळेच्या सहकार्याने दिवसाला 107 रुग्णांचे अहवाल प्राप्त होत आहेत. एखादा रुग्ण सापडल्यानंतर संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आरोग्य चौकशी, त्यांना घरात प्रतिबंध करणे, संबंधित रुग्ण राहत असलेल्या परिसराचे निर्जंतुकीकरण करणे, इमारतीचा काही भाग बंद करणे अशा उपाययोजना पालिकेने तातडीने हाती घेतल्या आहेत.