Breaking News

खासगी रुग्णालयांवर पालिकेचा वचक; महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजनेची होणार अंमलबजावणी

नवी मुंबई ः बातमीदार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना सुलभरीत्या उपचार मिळावा या दृष्टीने महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा यासाठी नवी मुंबई महापालिकेने समिती गठीत केली आहे. ही समिती खासगी रुग्णालयांचे उपचाराचे दर निश्चित करणार आहे.

राज्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवी मुंबई पालिकेचा पाहणी दौरा केला होता. या वेळी त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना लागू करण्याची सूचना आयुक्तांना केली होती. अव्वाच्या सव्वा दर आकारणीची बाब पालिकेने गांभीर्याने घेतल्याने यापुढे खासगी रुग्णालयांवर पालिकेचा वचक राहणार आहे. नवी मुंबई महानगर पालिका कार्यक्षेत्रातील सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये या योजनेची अंमलबजावणी करणे, सनियंत्रण करणे व या प्रकरणी तक्रार असल्यास त्यावर कार्यवाही करण्याकरिता महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी महानगरपालिका स्तरावर समिती गठीत केली आहे. ही समिती अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली आहे. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब सोनावणे या समितीचे सदस्य सचिव आहेत. आरोग्य विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे व अधीक्षक उत्तम खरात समितीचे सदस्य आहेत. ही समिती सार्वजनिक आरोग्य विभागाच्या शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करून याबाबतचा अहवाल महापालिका आयुक्तांना सादर करेल. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांनी खासगी रुग्णालयांच्या शुल्काबाबत किंवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेबाबत तक्रारी असल्यास समितीला कळवावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.

Check Also

खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …

Leave a Reply