देशात बुधवारपासून अनलॉक 2 ला सुरुवात होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन अतिशय संयतपणे येणार्या परिस्थितीविषयी दिशादिग्दर्शन तर केलेच, खेरीज आवश्यक तेथे वास्तवाची जाणीव करुन देत सामाजिक तसेच वैयक्तिक पातळीवर होत असलेल्या हेळसांडीबद्दल टोकले देखील. नोव्हेंबरअखेरपर्यंत 80 कोटी गरीब जनतेला मोफत धान्य देण्याची त्यांची घोषणा हा सर्वात मोठा दिलासा आहे. एकाच वेळी कोरोनासारखे अभूतपूर्व संकट आणि चीनसारखा कावेबाज शत्रू या दोघांचाही समर्थपणे सामना करणारे नेतृत्व म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे होत. बुधवारपासून देशात अनलॉक 2 ला सुरुवात होत आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी लॉकडाऊनच्या निर्बंधांना हळूहळू शिथिल करणे आवश्यकच आहे. त्या प्रक्रियेचा दुसरा टप्पा म्हणजेच अनलॉक 2. त्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून नव्या नियमांची घोषणा होत असताना पंतप्रधानांनी देशाला संबोधित करुन अतिशय प्रगल्भपणे परिस्थितीची यथायोग्य जाणीव करुन दिली. सर्वप्रथम त्यांनी अनलॉक 1 मध्ये व्यक्तिगत आणि सामाजिक पातळीवर कोरोनासंबंधी दक्षता घेण्याऐवजी बेदरकारीच वाढल्याचे दिसून आल्याचे सांगितले हे बरेच झाले. मोदींच्या या उद्गारांसंदर्भात प्रत्येकानेच आसपास तसेच अंतर्मनात डोकावून पहावे. लॉकडाऊन 1 मध्ये तुम्ही जशी काळजी घेत होता तशीच आता घेत आहात का? उलट आता तशी काळजी घेण्याची जास्त गरज आहे या मोदींच्या सूचनेचा प्रत्येकानेच अंतर्मुख होऊन विचार करावा. दक्षतेच्याबाबतीत हेळसांड करणार्यांना आपणच रोखले, टोकले आणि समजावले पाहिजे अशीही सूचना मोदीजींनी केली आहे. शहरातून गावी ये-जा करणार्यांना, लग्नसोहळे आयोजित करणार्यांना, बिनदिक्कत भेटीगाठींमध्ये रमणार्यांना मोदींची ही सूचना लागू केली पाहिजे. मास्क न लावल्यामुळे 13 हजारांचा दंड भरणार्या कुणा देशाच्या पंतप्रधानांचा उल्लेख मोदींनी केला. आपल्या देशातील नियम न पाळणार्या ‘बाणेदार’ नेत्यांना यातून वगळू नये हेही मोदींनी स्पष्ट सुचविले आहे. पंतप्रधानांच्या भाषणातीस सर्वात महत्वाची घोषणा ही अर्थातच ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजने’ची होती. गेले तीन महिने या योजनेअंतर्गत 80 कोटी लोकांना मोफत धान्य दिले जात आहे. येणारा थेट दिवाळी वा छटपूजेपर्यंतचा काळ अनेक सणावारांची रेलचेल असणारा असेल हे लक्षात घेऊन ही योजना थेट नोव्हेंबरअखेरपर्यंत सुरुच ठेवण्यात येणार असल्याची अत्यंत दिलासादायक घोषणा मोदींनी केली. या योजनेअंतर्गत पाच किलो गहू किंवा तांदूळ व एक किलो चणाही मोफत दिला जाणार आहे. सणासुदीच्या काळात घरात चूल पेटली नाही असे एकही कुटुंब देशात असता कामा नये असा निर्धार व्यक्त करतानाच त्यादृष्टीने ‘एक राष्ट्र-एक रेशन कार्ड’ योजनाही लवकरच सुरु करत असल्याची घोषणा पंतप्रधांनांनी केली आहे. पोटापाण्यासाठी आपले गाव सोडून इतर राज्यांमध्ये जाणार्या स्थलांतरित मजुरांची दुर्दशा आपण पाहिली आहेच. त्या सार्यांना या दोन्ही योजनांमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या पाच महिन्यात मोफत अन्न योजनेवर 90 हजार कोटींपेक्षा जास्त खर्च होणार आहे. गेल्या तीन महिन्यांतील खर्च विचारात घेता ही रक्कम दीड लाख कोटींच्या घरात जाते. अमेरिकेच्या लोकसंख्येच्या अडीचपट तर ब्रिटनच्या लोकसंख्येच्या बारा पट इतक्या लोकांना भारतात मोफत अन्न पुरवठा केला जाणार आहे याचा उल्लेख करुन पंतप्रधानांनी भारतासमोरील आव्हानांची तौलनिक व्याप्तीच लक्षात आणून दिली. कोरोना आघाडीवरही इतर देशांची तुलना करता भारताने परिस्थिती बरीच सावरली आहे. आपल्या देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण साठ टक्क्यांजवळ पोहोचले आहे. सकारात्मकतेचा हा आलेख असाच उंचावत न्यायचा असेल तर ‘स्वत:ची काळजी घ्या’ या मोदींच्या आग्रहाचा मान आपण ठेवलाच पाहिजे.
Check Also
खांदा कॉलनीतील ‘उबाठा’चे पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपमध्ये
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला लागलेली गळती सुरूच …