पनवेल ः प्रतिनिधी
पनवेल महानगरपालिका हद्दीतील हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या सेवेत हलगर्जीपणा होत असल्याच्या गंभीर बाबीकडे पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका दर्शना भोईर यांनी पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.
महानगरपालिके अंतर्गत उपचार घेत असलेल्या विविध ठिकाणी रुग्णांना सेवा देताना मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा होत आहे. इंडिया बुल्स या ठिकाणी ठेवलेल्या रुग्णांकडे डॉक्टर लक्ष देत नसल्याचे निदर्शनास येत आहे. एमजीएम रुग्णालयातही रुग्णांना जेवण आणि नाष्टा वेळेवर मिळत नाही. महानगरपालिकेद्वारे ताब्यात घेण्यात आलेल्या विविध हॉस्पिटलमध्ये बेड्सची संख्या कमी पडत असून कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटल तातडीने ताब्यात घेण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे. तरी पनवेल महानगरपालिका अंतर्गत उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची सेवा सुधारण्यात यावी. कोरोनाबाधित रुग्णांना चांगल्या प्रकारे सेवा देण्यासाठी बेड्स वाढविण्याकरिता कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलसोबतच इतर मोठी हॉस्पिटल्स ताब्यात घेण्यात यावीत, अशी विनंती नगरसेविका दर्शना भोईर यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे.