जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन साधेपणात साजरा
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 89वा स्मृतिदिन बुधवारी (दि. 25) शासकीय इतमामात साजरा झाला. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे हा कार्यक्रम यंदा साधेपणात झाला.
ब्रिटिशांच्या अन्यायाविरुद्ध उरण तालुक्यातील चिरनेर येथे 25 सप्टेंबर 1930 रोजी जंगल सत्याग्रह करण्यात आला होता. या सत्याग्रहात धाकू गवत्या फोफेरकर, नाग्या महादू कातकरी (चिरनेर), आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे), परशुराम रामा पाटील (पाणदिवे), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली), रामा बामा कोळी (मोठी जुई), हसुराम बुधाजी घरत (खोपटे), आनंदा माया पाटील (धाकटी जुई) या नरवीरांना हौतात्म्य आले, तर अनेक स्वातंत्र्यसैनिकांना कारावास झाला होता.
चिरनेर येथील जाज्वल्य लढ्याचा स्मृतिदिन दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो. या सत्याग्रहाच्या 89व्या स्मृतिदिनानिमित्त पोलिसांनी शासकीय सलामी देऊन हुतात्म्यांना आदरांजली वाहिली, तर रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, सिडकोे अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटी विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी हुतात्म्यांना अभिवादन केले.