नवी मुंबई : बातमीदार – सीबीडी येथील अशाच ग्रीन व्हॅली परिसरात प्रीतम भुसाणे व तन्वी पाटणकर या तरुणांनी स्थापन केलेली पुनर्वसू फाऊंडेशन संस्था जंगली प्राणी जगवण्यासाठी, वनसंपदा जपण्यासाठी धडपडते आहे. त्यासाठी सध्या या फाऊंडेशनने वेगळीच कल्पकता लढवली आहे. त्यानुसार जंगलातील दगडांवर विविध प्राण्यांची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्यामुळे हे दगड हुबेहूब प्राणी, पक्षी व किटकांसारखे दिसू लागले आहेत.
नवी मुंबई शहरी भाग असला व विकासासाठी डोंगर पोखरून वनसंपदा नष्ट केली जात असली तरी काही हिरव्यादाट डोंगररांगा आपले अस्तित्व टिकवून आहे. सीबीडी बेलापूर सेक्टर 9 येथील डोंगराळ भाग हा ग्रीन व्हॅली म्हणून प्रसिद्ध आहे. पैसा लोलुप मानवाची नजर न गेल्याने या भागात जंगल अस्तित्वात आहे. यात घोरपड, विवीध जातींचे साप, कीटक, मुंगूस, ससा, साळिंदर, रानडुक्कर, फुलपाखरे, विविध जातींचे पक्षांचा कायम वावर राहिला आहे. याच सीबीडी बेलापूर भागात राहणार्या तरुणांकडून पुनर्वसु फाऊंडेशन संस्थेची स्थापना केली गेली आहे. संस्थेने सध्या पुढाकार घेत नागरिकांना जंगलाची गोडी लागावी, निसर्गाबद्दल आकर्षण वाटावे यासाठी आगळी वेगळी कल्पना अंमलात आणली आहे. त्यानुसार डोंगरावर जाणार्या वाटेभोवती असणार्या विविध दगडांना व भल्या मोठ्या खडकांवर कलात्मकतेने विविध प्राण्यांची, पक्षांची कीटकांची रूपे ऑइलपेंटने चितारली आहेत. यात नवी मुंबईसह ठाणे, पनवेल येथील सभासद आहेत. या संस्थेचे मुख्य काम सर्पमित्र म्हणून असून अनेक सापांना या तरुणांकडून जीवदान दिले गेले आहे. तसेच या डोंगरावर जाऊन प्राण्यांसाठी पाण्याचे नैसर्गिकरित्या हौद तयार करणे, त्यात वेळवेळी पाणी टाकणे, वृक्षारोपण करणे व येथील प्राण्यांचा अभ्यास करणे हे आहे. अनेक विकासकामे करून शहराचे रुपडे पालटले जात असले तरी निसर्गाचा वापर करून निसर्गलाच पर्यटनाचीओळख मिळवून देण्याच्या या पुनर्वसू संस्थेचे नागरिकांकडून कौतूक होऊ लागले आहे.
दुर्लक्षित भागाला नवी झळाळी
उपक्रमामुळे या दुर्लक्षित भागाला नवी झळाळी प्राप्त झाली आहे. सकाळी वॉकसाठी नागरिक या भागात येत असतात मात्र या कल्पनेने लहान मुलांना देखील हे ठिकाण आकर्षित करत आहेत. नवी मुंबईत उद्यानांची कमतरता नाही, मात्र या तरुणांनी केलेल्या मेहनतीने नवी मुंबईत नव्याने पर्यटन स्थळ विकसित झाले आहे. असे म्हटले तर वावगे ठरू नये.