Breaking News

सर्वसामान्य नागरिकाला सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र उपयुक्त ठरेल

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विश्वास

पनवेल : रामप्रहर वृत्त

सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या अनुषंगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतचा संकल्प देशाला दिला आहे. या संकल्पनेच्या आधारे सर्वसामान्य नागरिकाला सक्षम करण्यासाठी आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र उपयुक्त ठरेल, असा विश्वास भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 18) येथे व्यक्त केला.

आत्मनिर्भर भारतच्या माध्यमातून विविध योजनांचा लाभ सर्वसामान्यांना मिळवून देण्यासाठी भारतीय जनता युवा मोर्चा उत्तर रायगड जिल्ह्याच्या वतीने पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात आत्मनिर्भर भारत मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आत्मनिर्भर भारत उपक्रमाचे कोकण विभाग संयोजक विनय सावंत, समिर शेख, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक अजय बहिरा, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष मयुरेश नेतकर, जिल्हा सरचिटणीस चिन्मय समेळ, दक्षिण भारतीय सेलचे संयोजक श्रीनिवास कोडरू आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

आत्मनिर्भर भारत उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी, युवक, महिला, सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा, तसेच लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी समितीने जबाबदारीने काम करावे, असे आवाहन  आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केले. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येक नागरिकाचा विचार करून विविध योजना अमलात आणल्या.

कोरोनासारख्या वैश्विक महामारीने संपूर्ण जग घाबरले. या स्थितीतही पंतप्रधान मोदींनी सर्वसामान्य नागरिकाला मोठ्या प्रमाणात आधार दिला. गरीब कल्याण योजना राबवत आत्मनिर्भर भारतासाठी त्यांनी योजना आणल्या. आज परदेशांनाही कोरोना लस देण्याचे काम आपला देश करीत आहे आणि हे पंतप्रधान मोदींमुळे शक्य झाले आहे. त्यांच्यामुळेच आपल्या देशाचे नाव जगभरात सन्मानाने घेतले जात असून, जग आपल्या पंतप्रधानांच्या कार्याचे कौतुक करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

टू जी, थ्री जी, जिजाजी ही परंपरा मोडीत काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला प्रगतीच्या वाटेवर नेत आहेत. एकीकडे देशाला आधार देण्याचे काम पंतप्रधान मोदी करीत आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्रातील सरकार मात्र राजकारणच करीत बसले आहे. या राज्य सरकारला राज्याचे आरोग्य सांभाळता येत नसल्याची टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केली. आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम करून अभिवादन केले जाते, त्यांची प्रेरणा घेतली जाते, मात्र राज्य सरकारने खुद्द शिवनेरी किल्ल्यावर 144धारा लावून संचारबंदी लागू केली तसेच कार्यक्रमांना बंदी घातली आहे. हा कुठला न्याय आहे, असा सवाल व्यक्त करीत आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.

आत्मनिर्भर भारत तरुण उद्योजकांसाठी सुवर्णसंधी असल्याचे या योजनेच्या कोकण विभागाचे संयोजक विनय सावंत यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारताच्या योजना सोप्या पद्धतीने तरुणांपर्यंत पोहचविण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी विविध माध्यमांचा उपयोग करावा. यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या कार्यकर्त्यास माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव तसेच मार्गदर्शन करण्यात येईल, अशीही माहिती सावंत यांनी दिली.

आत्मनिर्भर भारत कमिटीतील पदाधिकार्‍यांना या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्र प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयुरेश नेतकर यांनी, तर सूत्रसंचालन प्रवीण मोहोकर यांनी केले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास स्पर्धेचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने तालुकास्तरीय क्रीडा आणि व्यक्तिमत्व विकास …

Leave a Reply