महाड ः प्रतिनिधी
महाड-विन्हेरे-नातूनगर या पर्यायी महामार्गावरील कुर्ले धरणाजवळ बुधवारी रात्री दरड कोसळून हा मार्ग वाहतुकीस बंद राहिला होता. गुरुवारी (दि. 9) सकाळी दरड कोसळल्याचे निदर्शनास येताच सार्वजनिक बांधकाम विभागाने दरड हटवण्यास सुरुवात केली. दुपारपर्यंत हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला, मात्र या ठिकाणी रस्ता रुंदीकरणासाठी केलेल्या खोदकामामुळे ही माती रस्त्यावर कोसळत आहे. आणखी काही ठिकाणी असाच धोका कायम आहे.
महाडमधून खेडकडे जाणार्या महाड-विन्हेरे- नातूनगर या पर्यायी महामार्गावर बुधवारी रात्री कुर्ले गावानजीक असलेल्या धरणाजवळ मातीचा मोठा भराव रस्त्यावर आला. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आधीच रत्नागिरी जिल्ह्याने सीमाबंदी केल्याने या मार्गातील वाहतूक बंद असली तरी कुर्ले, आंबवली, रेवतळे, उंदेरी, शिरवली, विन्हेरे, फौजी आंबवडे आदी गावातील नागरिकांना ये-जा करण्यासाठी याच मार्गाचा अवलंब करावा लागतो. यामुळे सकाळी महाडकडे दूध, भाजीपाला घेऊन येणार्या शेतकर्यांना आणि कारखाना कामगारांना महाडमध्ये येता आले नाही. शिवाय महाडमधूनही लोकांना जाता आले नाही. सकाळी सात वाजेपर्यंत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कोणीच अधिकारी अगर कर्मचारी याकडे फिरकले नाहीत. त्यानंतर दरड कोसळल्याचे समजताच जेसीबीच्या साहाय्याने मातीचा भराव काढण्यास सुरुवात झाली. दुपारपर्यंत हा मार्ग खुला करण्यात आला.
कुर्ले ते महाडदरम्यान असलेल्या वळणदार रस्त्यातील माती हटवून वळणांची रुंदी वाढवण्यात आली आहे. शिवाय गतवर्षी ज्या ठिकाणी माती रस्त्यावर आली त्या ठिकाणीदेखील खोदकाम करण्यात आले, मात्र वरील बाजूने संपूर्ण माती असल्याने मुसळधार पावसात ही माती सुटण्यास सुरुवात होते. गेली दोन दिवस पडणार्या पावसातदेखील अशीच स्थिती निर्माण झाली आहे. कुर्ले ते शिरगावदरम्यान अजून काही ठिकाणी अशीच दरड कोसळण्याची स्थिती निर्माण झाली आहे.
Check Also
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विजयाचा पीआरपीकडून निर्धार
पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार प्रशांत ठाकूर यांना चौथ्यांदा विजयी …