Breaking News

पिण्याच्या पाण्यात आढळले किडे

खोपोली : प्रतिनिधी – नगरपालिका हद्दीतील लव्हेज गावात पालिकेतर्फे पुरविण्यात येणार्‍या पिण्याच्या पाण्यात किडे व सांडपाणी आढळल्याने ग्रामस्थात तीव्र संतापाची लाट उसळली. पाणीपुरवठ्याचा गलथान कारभाराबाबत गावात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

नगरपालिका प्रभाग क्र. 1 मध्ये अनेक दिवसांपासून पाण्याच्या कमी दाबामुळे अनेक रहिवाशांना पाण्यापासून वंचित रहावे लागत होते. त्यानंतर पाण्याच्या कमी दाबामुळे अनेकांनी छोटे पंप बसविले त्यामुळे तर शेवटच्या टोकाला असणार्‍या रहिवाशांना चार ते पाच दिवस पाणीच मिळत नव्हते. याबाबत अनेकांनी पाणीपुरवठा विभागात तक्रार केल्यानंतर लव्हेज शाळेसमोर पाईप जोडणी तपासण्यासाठी खोदकाम करण्यात आले. व पाइपलाइन्स तपासण्यात आले पण दुसर्‍या दिवशी सकाळी पाणी सोडण्यात आल्यानंतर पाइपलाइनद्वारे जिवंत किडे व सांडपाणी आले. त्यामुळे रहिवाश्यात संतापाची लाट उसळली.

दरम्यान नगरपालिका स्थापन झाल्यापासून लव्हेज गावात पाण्याचे पाईप जीर्ण झाले आहेत व अनेक पाईप गटाराच्या शेजारून गेल्यामुळे ज्या ठिकाणी पाईप लिकेज आहेत त्या ठिकाणी सांडपाणी शिरून नळाद्वारे खराब पाणी येत असावे असा अंदाज पाणीपुरवठा विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे. काही महिन्यापूर्वी विभागाने नवीन पाईप लाईन टाकले त्यामधून रहिवाशांनी नळजोडणी घ्यावी, असे ग्रामस्थांना सांगूनही त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे हा तिढा केव्हा सुटणार याबाबत उलट-सुलट चर्चा आहे.

सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. त्यात पाण्यापासून रोगराई झाल्यास काय करायचे कारण साधा ताप आला तर रुग्णालय कोरोना टेस्ट करावयास सांगते व तो खर्च आम्हा सर्वसामान्यांना परवडणारा नाही. तेव्हा प्रशासनानेच खबरदारी घेऊन शुद्ध पाण्याचा पुरवठा करून ग्रामस्थांना दिलासा द्यावा.

– अरविंद पाटील (ग्रामस्थ लव्हेज)

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply