
कर्जत : बातमीदार
नेरळ-कळंब रस्त्यावरील वादग्रस्त विद्युत खांब अद्याप काढण्यात न आल्याने ग्रामस्थ व प्रवासी पुन्हा एकदा आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. या बेकायदेशीर कामाच्या परवानग्या व मान्यता आदेश रद्द करण्यात आलेले असताना अद्याप हे अनधिकृत धोकादायक खांब काढण्यात आलेले नाहीत. नेरळ-कळंब रस्त्यावर काही महिन्यांपूर्वी वरई येथील एका गृहप्रकल्पास विद्युत पुरवठा करण्यासाठी पोल टाकण्याचे काम सुरू होते. अतिविद्युतदाब वाहिनीचे हे खांब बेकायदेशीरपणे साईड पट्टीवर टाकले जात होते. ते प्रवासी, वाहतूकदार सर्वांसाठीच धोकादायक असल्याने ग्रामस्थांनी या कामास आक्षेप घेऊन विरोध केला. ग्रामस्थ व स्थानिकांच्या तक्रारीनंतरदेखील सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण या दोन्ही विभागांनी त्याकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. त्यामुळे ग्रामस्थांना आंदोलन
उभारावे लागले. ग्रामस्थांच्या आंदोलनात्मक पवित्र्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने 3 नोव्हेंबर 2018 रोजी आदेश काढून या बेकायदेशीर कामाची परवानगी व मान्यता आदेश रद्द केले, तसेच सदर पोल त्वरित काढून टाकण्याचे आदेश संबंधित कंपनीला दिले आहेत. यानंतर साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटूनही हे अतिक्रमण दूर करण्यात आले नाही. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरणच्या संबंधित अधिकार्यांशी वारंवार संपर्क साधूनही आतापर्यंत दुर्लक्ष केले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता अजयकुमार सर्वगौड, महावितरणचे उपअभियंता आनंद घुळे यांनी सदर पोल आम्ही लवकरात लवकर काढून टाकतो, असे वारंवार सांगितले होते.
पोशीर रस्त्यावरील खांब टाकण्याच्या परवानग्या रद्द झाल्या आहेत. पोल काढण्यासाठी प्रोसेस सुरू केली आहे. आठवडाभरात पोल काढण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.
-आनंद घुले, उपअभियंता, महावितरण
पोशीर रस्त्यावरील पोलसंदर्भात आमच्या उपअभियंत्यांशी चर्चा केली असून तसे इन्स्ट्यिूमेंट तयार करण्यात येणार आहे व ते डिव्हिजन ऑफिसला सादर करण्यात येणार आहे. ते मंजूर झाल्यास लवकर खांब काढण्यात येणार आहेत.
-आर. एम. वेलदोडे, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग-कर्जत