उरण : प्रतिनिधी
उरण तालुक्यातील बारावीचा निकाल जाहीर झाला असून 91.75 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असल्याची माहिती उरण गटशिक्षणाधिकारी दिपाली परब यांनी दिली आहे.
उरण तालुक्यातुन बारावीच्या परीक्षेत 1771 विद्यार्थी बसले होते. यामध्ये विज्ञान शाखा 625, वाणिज्य शाखेत 702 तर कला विभागात 445 विद्यार्थ्यांचा समावेश होता. यापैकी विज्ञान शाखेतून 624, वाणिज्य शाखेतील 661 तर कला विभागातील 340 असे एकूण 1625 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 146 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. उरण तालुक्याचा निकाल 91.75 टक्के लागला असल्याची माहिती उरण गटशिक्षणाधिकारी दिपाली परब यांनी दिली आहे.
एमएनएम कनिष्ठ महाविद्यालय
पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या एम. एन. एम. विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून विद्यालयाचे नाव उंचावले आहे. यावर्षीही विद्यालयाचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, संस्थेचे सचिव डॉ. सिद्धेश्वर गडदे, विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका नम्रता न्यूटन यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले, तसेच पुढील वाटचालीस सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शुभेच्छाही दिल्या.
खारघर शहराचा बारावीचा निकाल 97 टक्के
खारघर : प्रतिनिधी
नवी मुंबईत शैक्षणिक हब म्हणुन ओळखल्या जाणार्या खारघर शहराचा बारावीचा निकाल 97 टक्के लागला आहे. सीबीएसई व स्टेट बोर्ड दोघांचे निकाल जाहीर झाले असून संपूर्ण खारघर शहरातून 723 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. खारघर शहरात स्टेट बोर्डाचे 9 तर सीबीएसई बोर्डाशी संलग्न असणारे पाच महाविद्यालये आहेत. या सर्व 14 महाविद्यालयात एकूण 723 बारावीचे विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. यापैकी 703 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. खारघर शहरातील 14 पैकी चार महाविद्यालयांनी बारावीच्या परीक्षेत बाजी मारत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. या चार महाविद्यालयात लोकनेते रामशेठ ठाकूर महाविद्यालय, सत्याग्रह महाविद्यालय, केपीसी तसेच हार्मोनी महाविद्यालयाचा समावेश आहे. उर्वरित इतर महाविद्यालयांचा निकाल 96 टक्केपेक्षा जास्त निकाल लागला आहे.
नेरूळ विद्याभवन कॉलेज
नवी मुंबई : बातमीदार
पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेत भरघोस गुण संपादन करून 12 वर्षांची उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली. नेरूळ शाखेतील वाणिज्य विभागाचा निकाल 100% लागला. कोमल पोळेकर हिने 86.46% मिळवून कॉलेजच्या वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक पटकावला. संजना इंगळे, स्नेहल आदिष्ट यांनी अनुक्रमे 86% आणि 84.76% गुण मिळवत द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. विद्याभवनच्या विज्ञान शाखेचा निकाल 98% लागला. प्रसन्न पवार याने 87.07% गुण मिळऊन कॉलेजच्या विज्ञान विभागातून प्रथम क्रमांक पटकावला. मिजाण नाईकवडी आणि ऋषिकेश उंडे यांनी अनुक्रमे 84.46 % आणि 82.77% गुण संपादन करून द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवला. संस्थेचे माजी कार्याध्यक्ष आणि संचालक प्रा. कृ. ना. शिरकांडे, संचालक डॉ. शंकर पांडुरंग किंजवडेकर, कोषाध्यक्ष राजेंद्र बोर्हाडे, संचालक दिनेश मिसाळ, प्राचार्य शिवाजी माळी आणि सर्व शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.