Breaking News

शिहू बेणसे भागात विजेचा लपंडाव

कोरोना रुग्णांची दमछाक

पाली ः प्रतिनिधी

निसर्ग चक्रीवादळानंतर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतील वीजपुरवठा सुरळीत झाला, मात्र शिहू बेणसे परिसरासह अन्य भागातील विजेचा लपंडाव काही केल्या थांबेना. या विभागात अनेक कोरोना रुग्ण गृहविलगीकरणात असून वीजपुरवठा खंडित झाल्यावर या रुग्णांची दमछाक होत आहे. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यावर त्यांचे प्रचंड हाल होत आहेत. अशातच रात्री मच्छर रक्त पिताहेत. याबरोबरच  पावसाळ्याचे दिवस असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. परिणामी विजेचा लपंडाव थांबवून वीजपुरवठा सुरळीत करा. सहनशीलतेचा अंत पाहू नका, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा संताप महिलावर्ग व तरुणाईतून व्यक्त होत आहे.

सध्या पावसाळ्याचे दिवस असून कधी दिवसा तर कधी रात्री बत्ती गुल होत आहे. लॉकडाऊनमुळे सारेच घरात आहेत. विजेच्या लपंडावाने नागरिक, मुले, वृद्ध सारेच  बेजार झाले. खंडित झालेला वीजपुरवठा केव्हा पूर्ववत होईल याचा अंदाज नसल्याने नागरिक चिंतेत आहेत. वीज वितरण अधिकारी-कर्मचारी मात्र मंद गतीने पावले टाकताना दिसतात. वीज वितरण कर्मचार्‍यांची कार्यतत्परता दिसत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. वादळाने उद्ध्वस्त झालेली विद्युत यंत्रणा उभी करण्यासाठी अनेक ठिकाणी तरुण वीज वितरणच्या मदतीला सरसावले होते. त्यामुळे वीजपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली होती, मात्र आता रोजच बत्ती गुल होत आहे.

सातत्याने विजेचा लपंडाव सुरूच असून वीज देयके मात्र आवाक्याबाहेर येत असल्याने सर्वसामान्य जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे. वीजपुरवठा खंडित होताच बँकांचे व्यवहार ठप्प होत आहेत. नेटवर्क सेवा बंद पडत आहे. इंटरनेट सुविधेशी संबंधित सर्व शासकीय-निमशासकीय कामे बंद होत आहेत. या ठिकाणी  कधी सलग तीन-चार दिवस तसेच अनेकदा 10 दिवसही वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. शिहू बेणसे विभागात आदिवासी वाड्या-पाड्यांचा समावेश असून मोठ्या प्रमाणात लोकवस्ती आहे. सातत्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरते.

पावसाळ्यात गवत वाढले असून सर्प, विंचू व किटकांच्या भीतीने अंधारात घराबाहेर पडणे धोक्याचे झाले आहे. डास व मच्छरांच्या उपद्रवाने नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच व्यावसायिकांचेही आर्थिक नुकसान होत आहे. वीज वितरण अधिकारी-कर्मचार्‍यांनी येथील वीज समस्या कायमस्वरूपी संपविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply