पेण ः प्रतिनिधी
पेण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. एकीकडे रुग्णांची वाढ आणि दुसरीकडे उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची कमतरता या गोष्टींची सांगड घालण्यासाठी आता स्थानिक प्रशासनाने पेण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यांची नेमणूक करून महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
पेण तालुक्यातील संशयित कोविड रुग्णांचे नमुने घेण्याचे काम अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत सुरू आहे. या ठिकाणी दोन टेक्निशियन आहेत, मात्र रुग्णांची वाढती संख्या व त्यांच्या संपर्कातील नातेवाइकांचे वा नागरिकांचे नमुने मोठ्या प्रमाणात घ्यावे लागत आहेत. परिणामी अतिरिक्त ताणामुळे नमुने घेण्यास विलंब होत आहे. भविष्यातही हे नमुने घेण्याची संख्या वाढू शकते.
या सर्व गोष्टींचा विचार करून उपजिल्हा रुग्णालय व तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडील कार्यरत वैद्यकीय अधिकार्यांची आठवड्यातील प्रत्येक वारानुसार नेमणूक करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. त्याप्रमाणे सोमवार ते बुधवार उपजिल्हा रुग्णालयातील, तर गुरुवारी वाशी प्राथमिक आरोग्य केंद्रातील, शुक्रवारी कामार्ली प्राथमिक आरोग्य केंद्रातील, शनिवारी जिते प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
नागोठणे विभागात 95 पॉझिटिव्ह रुग्ण
नागोठणे ः प्रतिनिधी
कोरोनाच्या महामारीला सुरुवात झाल्यानंतर नागोठणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेण आणि रोहे तालुक्यातील विविध गावांमध्ये 95 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यातील बेणसे गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, 50 रुग्ण उपचारानंतर घरी परतले आहेत. उर्वरित 44 रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चेतन म्हात्रे यांच्या माहितीनुसार शनिवारी सुकेळीतील जिंदाल कंपनीचे दोन कामगार तसेच नागोठणे मीरानगर भागात नव्याने एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आता येथील एकूण रुग्णांची संख्या 98 झाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या महामारीला सुरुवात झाल्यानंतर बर्याचशा कालावधीनंतर म्हणजेच 25 मे रोजी विभागात पेण तालुक्यातील चोळे टेप गावात मुंबईहून आलेल्या एका महिलेला लागण होऊन कोरोनाच्या विषाणूंचा या भागात शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर येथील संसर्ग वाढत गेला.