नगरसेविका वृषाली वाघमारे यांची मागणी
पनवेल : रामप्रहर वृत्त
इंडिया बुल्स येथील अलगीकरण व विलगीकरण सेंटरमध्ये महिलांसाठी महिला सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत, अशी मागणी भाजप नगरसेविका वृषाली वाघमारे यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांना लेखी निवेदन दिले आहे.
नगरसेविका वाघमारे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये म्हटल्याप्रमाणे पनवेल महानगरपालिका अंतर्गत कोन गाव येथील कोविड सेंटरमध्ये गुरुवारी (दि. 16) रात्री एका नराधमाने कोविड रुग्ण असलेल्या महिलेवर बलात्कार केला. हा प्रकार संपूर्ण महाराष्ट्राला हादरुन सोडण्यासारखा आहे. अशा निंदनिय प्रकाराने पनवेल तालुका व विशेष करुन पनवेल महानगरपालिकेची मान खाली गेली. या कोविड सेंटरमध्ये अलगीकरण व विलगीकरण होत असताना त्याठिकाणी महिला, मुली, ज्येष्ठ नागरिक यांचा समावेश असतो. या ठिकाणी महिलांची सुरक्षितेसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था केलेली नाही. म्हणून महिलांसाठी विशेष महिला सुरक्षा रक्षण असणे गरजेचे आहे. या सेंटरमध्ये व्यवस्थापन हे निकृष्ठ दर्जाचे असल्याचे आढळत आहे. रुमच्या खिडक्यांच्या काचा तुटलेल्या आहेत, दरवाज्यांच्याही कड्या लागत नाही. तसेच त्या ठिकाणी व्यपस्थापकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसतात. त्यामुुळे अशा निकृष्ठ व्यवस्थापनामुळे आज एका महिलेवर ही वेळ आली. त्यामुळे तेथील व्यवस्थापकीय अधिकारी आणि तेथे काम करीत असलेले कर्मचारी यांची ही व्यवस्थापनाविषयीची कसून चौकशी करण्यात यावी. यासर्व प्रकाराचा जाहीर निषेध पत्राद्वारे व्यक्त करुन बलात्कार करणार्या नराधामाला कायदेशीर अंमलबजावणी करुन लवकरात लवकर कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी केली आहे.