अलिबाग : प्रतिनिधी
मागील आठवड्यात पडलेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यात भातलावणीच्या कामांना वेग आला आहे. आतापर्यंत 70 टक्के क्षेत्रावर भातलावणी झाली आहे.
रायगड जिल्ह्यात एक लाख 23 हजार हेक्टर क्षेत्र भातलागवडीखाली होते. विविध कारणांमुळे हे क्षेत्र एक लाख चार हजार हेक्टरपर्यंत घटले आहे. यंदा कृषी विभागाच्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार एक लाख हेक्टर क्षेत्रावरच भाताची लागवड होणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात भात लागवड क्षेत्राच्या 70 टक्के म्हणजे 70 हजार हेक्टर क्षेत्रावर सध्या भातलावणी पूर्ण झाली आहे. येत्या काही दिवसांमध्ये भातलावणीची कामे पूर्ण होतील, असे कृषी विभागातर्फे सांगण्यात आले आहे.
भाताची रोपे तयार झाली आहेत. त्यांची वाढ समाधानकारक असून, सध्यातरी रोपांवर कोणत्याही रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही. तरीदेखील शेतकर्यांनी काळजी घ्यावी तसेच पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा.
-पांडुरंग शेळके, अधीक्षक
कृषी अधिकारी, रायगड