पनवेल : बातमीदार
सिडकोच्या वतीने दोन वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या महा गृहनिर्माण सोडतीतील सुमारे साडेतीन हजार घरांची लवकरच वाटप प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेली चार महिने लागू करण्यात आलेल्या टाळेबंदी काळात सिडकोने लाभार्थी ग्राहकांच्या ऑनलाइन प्रक्रिया सुरू ठेवलेल्या आहेत. यासाठी आता ‘निवारा केंद्र’ या सोडतीनंतरच्या पोर्टलद्वारे ऑनलाइन सुनावणी घेतली जाणार आहे. त्यामुळे ग्राहकाला सिडकोत जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
दोन वर्षांपूर्वी सिडकोने 14 हजार 738 घरांची सोडत काढली होती. या घरांचे बांधकाम शहरातील विविध भागात सुरू आहे. ही घरे मिळालेल्या भाग्यवंत ग्राहकांची कागदपत्रे पडताळणी सुरू असतानाच मार्च महिन्यापासून देशात टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सिडकोच्या पणन विभागाने पहिले दोन महिने वाट पाहिल्यानंतर ऑनलाइन कागदपत्रे दाखल करणे, त्यांची छाननी, तक्रारी, सद्यस्थिती ही कामे सुरू करण्यात आली. त्यामुळे या काळात सिडको सहा हजार अर्जाची पडताळणी करू शकली. टाळेबंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आली असली तरी नवी मुंबईत अद्याप टाळेबंदी कायम आहे. त्यामुळे सिडकोत सुनावणीसाठी येणार्या ग्राहकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सिडको या ग्राहकांची ऑनलाइन सुनावणी घेणार असून ग्राहकांकडून कागदपत्रांची पूर्तता करुन घेतली जाणार आहे. यासाठी दूरचित्रसंवादाने त्या ग्राहकांशी संपर्क साधला जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सिडकोने मोठ्या प्रमाणात गृहनिर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातील काही इमारतींची कामे सुरू असून काही घरे शेवटच्या टप्प्यात आहेत. ग्राहकांच्या ऑनलाइन सुनावणी घेतली जाणार असून प्रत्येक ग्राहकाला संधी दिली जाणार आहे. कादगपत्रे आणि शुल्क यांचे व्यवहार पूर्ण करणार्या ग्राहकांना लवकरच वाटप आणि ताबा देण्याचा सिडकोचा प्रयत्न राहणार आहे.
-लक्ष्मीकांत डावरे, पणन व्यवस्थापक, सिडको
‘महा गृहनिर्माण’च्या कामाला आला वेग
सिडकोने या 15 हजार घरांच्या कामाला वेग दिला असून खारघर, तळोजा येथे काही घरे बांधून तयार आहेत. पूर्वे नियोजित कार्यक्रमानुसार सिडको ऑक्टोबर 2020 मध्ये यातील काही घरांचे ताबा देणार आहे. याशिवाय काही शिल्लक घरांची विक्रीदेखील केली जाणार आहे.