मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या आमदारांनी तब्बल महिनाभरानंतर बुधवारी (दि. 27) आमदारकीची शपथ घेतली. विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी 288पैकी उपस्थित 285 सदस्यांना (दुपारी 1 वाजेपर्यंत) सदस्यत्वाची शपथ दिली.
महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन बुधवारी विधानभवनात झाले. सकाळीच कामकाज सुरू झाले. नव्या विधानसभेतील 288पैकी 285 आमदारांना विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कोळंबकर यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ दिली. यात रायगड जिल्ह्यातून आमदार प्रशांत ठाकूर, महेश बालदी, रविशेठ पाटील आदींचाही समावेश होता.
शपथविधीनंतर विधानसभेचे हे एका दिवसाचे अधिवेशन संपले. त्याचा प्रारंभ वंदे मातरम्ने, तर समारोप राष्ट्रगीताने झाला.